सायबर पोलिसांची वेगवान कारवाई, वाचवले १४ लाख रु.
मुंबई सायबर पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे डिजिटल स्कॅमचा बळी ठरलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचे लाखो रुपये परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईत राहणारे तक्रारदार हे एकेकाळी लंडनच्या एका प्रतिष्ठित कंपनीत लेखापाल (Accountant) म्हणून कार्यरत होते. २००५ मध्ये निवृत्त झाल्यानंतर ते शांतपणे मुंबईत आयुष्य जगत होते. मात्र, 4 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान घडलेल्या एका घटनेने त्यांचे आयुष्य ढवळून काढले. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे, या वृद्ध नागरिकाने ‘डिजिटल अरेस्ट’ दरम्यान स्वतःच्या बचावासाठी एक स्क्रीनशॉट घेतला होता. या स्क्रीनशॉटमध्ये एक महिला पोलिसांच्या गणवेशात दिसून येत आहे. या स्क्रीनशॉटसह इतर डिजिटल पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
या फसवणुकीची सुरुवात एका साध्या व्हॉट्सअॅप व्हीडिओ कॉलने झाली. कॉल करणाऱ्या ‘संजय’ नावाच्या व्यक्तीने आपण मुंबई पोलिसांचा अधिकारी असल्याचा दावा केला आणि थेट धक्कादायक माहिती दिली: “तुम्ही एका गंभीर मनी लाँडरिंग प्रकरणामध्ये अडकला आहात. तुमचा सहभाग असल्याचे पुरावे आमच्या हाती आले आहेत आणि तुम्हाला संपूर्ण तपासामध्ये सहकार्य करावे लागेल.”
सायबर गुन्हेगारांनी या निवृत्त नागरिकाला जाळ्यात ओढण्यासाठी अस्सल वाटावी अशी खोटी कागदपत्रे तयार केली होती. त्यांच्याच डेबिट कार्डचा बनावट फोटो दाखवून त्याचा गैरवापर झाल्याचे सांगितले. त्यानंतर व्हॉट्सअॅपवर बनावट ‘सरकारी’ दस्तऐवजांचा मारा सुरू केला.
या कागदपत्रांमध्ये सुप्रीम कोर्ट, ‘सेबी’ (SEBI) आणि ‘ईडी’ (ED) यांच्या नावावर जारी केलेले खोटे आदेश होते. इतकेच काय, तर भारत सरकारच्या सचिवांच्या नावाने स्वाक्षरी केलेले पत्र, अटक वॉरंट आणि बँक खाते गोठवण्याचा आदेश अशी ‘खरी वाटावी’ अशी कागदपत्रे पाहून ज्येष्ठ नागरिक पूर्णपणे हादरले.
गुन्हेगारांनी त्यांच्या मनावर दबाव आणायला सुरुवात केली. “तुम्ही आता ‘डिजिटल कस्टडी’मध्ये आहात. तपासादरम्यान तुम्ही कोणाकडेही याबद्दल वाच्यता केली किंवा सूचना पाळल्या नाहीत, तर तुम्हाला तात्काळ अटक होईल,” अशी धमकी वारंवार देण्यात येत होती.
आपल्याबरोबर फ्रॉड झाल्याचे लक्षात येताच, या आजोबांनी क्षणाचाही विलंब न करता दक्षिण सायबर पोलीस विभागाकडे धाव घेतली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्याकडे तक्रार नोंदवली.
या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन, तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन त्रिमुखे यांच्याकडे सोपवण्यात आला. ए.पी.आय. त्रिमुखे यांनी क्षणार्धात सूत्रे हलवली. त्यांनी त्वरित सायबर हेल्पलाईनच्या माध्यमातून कारवाई करत, आरोपींनी पैसे काढण्यापूर्वीच, ते ट्रान्सफर झालेले बँक खाते गोठवले (Freezed) आणि 14 लाख 99 हजार रुपये सुरक्षित केले, अशी माहिती ‘BBC मराठी’ च्या वृत्तामध्ये देण्यात आली आहे.