कालच्या उद्रेकानंतर नागपूरात तणावपूर्ण शांतता

नागपूर दि १८– नागपूरातील महाल परीसरात काल सायंकाळी दोन गटात झालेल्या तुफान दगडफेकी नंतर शहरात प्रचंड तणावाचे वातावरण होते. रात्री 2 वाजेपर्यंत महाल परीसरात प्रचंड तणाव होता. विविध प्रकारच्या अफवानंतर महाल परिसरातील तणावावर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे .समाजकंटकांच्या हल्ल्यात 15 पेक्षा अधिक पोलिस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले. या स्थितीतदेखील पोलिसांनी कायदा , सुव्यवस्था नियंत्रणात आणण्याचे पूर्ण प्रयत्न केले आणि रात्री उशिरा 2 वाजेपर्यंत महाल परिसरात तणावपूर्ण शांतता होती. महाल तसेच आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये पोलिसांची विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. पोलिसांकडून सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत होते. या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. समाजकंटकांनी सुमारे 100 दुचाकी तर 30 पेक्षा जास्त कार आणि चारचाकी फोडून नुकसान केले. तर हंसापुरी, इतवारी भागातील घरांवर तुफान दगडफेक केल्यानंतर या परिसरातही पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे. समाजकंटकांनी पोलीस वाहनांचीही तोडफोड केली.आज सकाळ पासूनच या परीसरात तणाव पूर्ण शांतता असून ठिकठिकाणी पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. पोलिसांनी समाजकंटकांना पकडण्यासाठी आज पासून कोंबिंग ऑपरेशन राबवायला सुरुवात केली आहे. तणावाचे हे लोण इतर भागात पसरू नये यासाठी शहरातील सर्वच भागांमध्ये पोलीसांना तैनात करण्यात आले आहे. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सह विविध राजकिय, धार्मिक नेत्यांनी नागरिकांना शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे.