सांस्कृतिक धोरण फेरआढावा अहवाल लवकरच शासनाकडे

ठाणे दि ६ (ML/KA/SL) : राज्य सांस्कृतिक धोरणाच्या फेर आढाव्यासाठी नियुक्त केलेल्या समित्यांचे कामकाज अंतिम टप्प्यात आलेले असून त्याबाबतचा अंतिम अहवाल लवकरच शासनास सादर करण्यात येईल, असे विनय सहस्त्रबुद्धे, कार्याध्यक्ष राज्य सांस्कृतिक धोरण फेर आढावा समिती यांनी स्पष्ट केले आहे. ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्य सांस्कृतिक धोरण फेर आढावा समितीची आज ठाणे येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीस विविध उपसमित्यांचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे (कारागिरी समिती), नामदेव कांबळे ( भाषा, साहित्य, ग्रंथ व्यवहार समिती), सुहास बहुळकर ( दृश्य कला समिती), बाबा नंदनपवार (गडकिल्ले ,पुरातत्त्व समिती) जगन्नाथ हिलीम (लोककला समिती), कौशल इनामदार (संगीत समिती), दीपक करंजीकर (रंगभूमी समिती), डॉ. संध्या पुरेचा (नृत्य समिती), गजेंद्र अहिरे (चित्रपट समिती), प्राची गडकरी (भक्ती संस्कृती समिती) आणि सांस्कृतिक कार्य संचालक तथा सदस्य सचिव सांस्कृतिक धोरण समिती बिभीषण चवरे तसेच इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.
राज्य सांस्कृतिक धोरण २०१० चा आढावा घेण्यासाठी राज्य शासनाने नोव्हेंबर २०२२ मध्ये सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठण केले होते. या समितीचे कार्याध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य समिती आणि उप समितीच्या वेळोवेळी बैठका झालेल्या आहेत. बदलत्या परिस्थितीत राज्य सांस्कृतिक धोरणाचा आढावा घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याकरता शिफारशी करणे आणि धोरण तयार करणे हे या समितीचे मुख्य कार्य आहे.
या समितीच्या अंतर्गत 10 उपसमित्या गठीत करण्यात आलेल्या असून, राज्यातील सर्व महसुली विभागात या समितीचे अनेक दौरे झालेले असून, त्यामध्ये अनेक संस्था तथा व्यक्ती यांना भेटी देण्यात आलेल्या आहेत. कालानुरूप सुसंगत असणारे सांस्कृतिक धोरण असावे आणि यामध्ये जनसामान्यांच्या सूचनाही अंतर्भूत व्हाव्यात याकरिता या समित्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत, असेही विनय सहस्रबुद्धे यांनी यावेळी सांगितले.
ML/KA/SL
6 Oct, 2023