मौनी अमावस्येनिमित्त रामकुंडावर स्नानासाठी गर्दी

नाशिक दि २९– मौनी अमावास्येला धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्व असून गोदावरी तीरावर स्नानाची ही संधी साधण्यासाठी आज पहाटेपासूनच भाविकांनी गोदा स्नानासाठी रामकुंडावर मोठी गर्दी केली आहे. भाविक स्नान करून कपालेश्वर आणि बाणेश्वर महादेव मंदिरात जाऊन मनोभावे शिवपूजन करीत आहेत. महिला भाविकांची संख्या लक्षणीय असून गोदावरीपूजन तसेच दर्शनासाठी भाविकांची रीघ लागलेली पहावयास मिळत आहे.
हिंदू धर्मात अमावस्येच्या तिथीला खूप महत्व आहे. पंचांगानुसार प्रत्येक अमावस्येचे वेगळे नाव वैशिष्ट्य आणि महत्व आहे. मात्र, काही अमावस्यांना विशेष महत्व आहे. त्यापैकीच मौनी अमावस्या एक आहे. या दिवशी मौन राहणे, स्नान करणे आणि दान करणे याचे महत्त्व शास्त्रांमध्ये सांगितले आहे. गोदावरी नदीवरील रामकुंडावर भाविक स्नानासाठी हजर होत असून गोदाघाटावर होणारी गर्दी लक्षात घेता पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. काही भाविकांकडून फुले आणि दीप गोदेच्या प्रवाहात सोडले जात असल्याने निर्माल्य हे अमृतकलशामध्ये टाकण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गोदावरीचे पावित्र्य जपण्याचे आवाहन पुरोहित संघ आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समितीकडून करण्यात आले आहे.