क्रिकेटपटू युवराज सिंगच्या बायोपिकची घोषणा
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिक्सर किंग म्हणून प्रसिद्ध असलेला टीम इंडियाचा माजी फलंदाज युवराज सिंगचं आयुष्य आता मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. युवराज सिंगच्या बायोपिक येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. कॅन्सरवर मात करून क्रिकेटच्या मैदानात परतलेल्या युवराज सिंगची कहाणी आता मोठ्या पडद्यावर येणार आहे. सोशल मीडियावर त्याच्या बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे. हा बायोपिक टी-सीरीजच्या बॅनरखाली तयार होणार आहे. भूषण कुमार आणि रवी भागचंदका या बायोपिकची संयुक्त निर्मिती करणार आहेत.
आपल्या बायोपीकविषयी बोलताना युवराज सिंग म्हणाला, “माझा प्रवास भूषण जी आणि रवी यांच्याद्वारे जगभरातील माझ्या लाखो चाहत्यांना दाखवला जाईल याचा मला खूप सन्मान वाटतो. क्रिकेट हे माझे सर्वांत मोठं प्रेम आणि शक्तीचा स्रोत आहे. मला आशा आहे की हा चित्रपट इतरांना त्यांच्या जीवनातील आव्हानांवर मात करण्यासाठी आणि त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरित करेल.” युवराज सिंगच्या या बायोपिकमध्ये त्याची भूमिका कोण साकारणार याचा खुलासा अद्याप झालेला नाह. युवराज सिंगने स्वत: एका मुलाखतीत सांगितले होते की, जर त्याच्यावर बायोपिक बनवला गेला तर त्याची भूमिका सिद्धांत चतुर्वेदीने साकारावी अशी त्याची इच्छा आहे. आता यासाठी सिद्धांत चतुर्वेदीला ऑफर दिली जाते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
युवराजची दिमाखदार कारकीर्द
युवराज सिंगने टीम इंडियासाठी ४० कसोटी, ३०४ एकदिवसीय आणि ५८ टी-२० सामने खेळले आहेत. युवराज सिंगने कसोटीत एकूण १९०० धावा केल्या आहेत, ज्यात ३ शतके आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. तर एकदिवसीय सामन्यांमध्ये युवराजने एकूण ८७०१ धावा केल्या आहेत, ज्यात १४ शतके आणि ५२ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय युवराज सिंगने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११७७ धावा केल्या आहेत.
SL/ML/SL
20 August 2024