विश्वचषक क्रिकेट उद्घाटन सोहळ्याचा दिवस निश्चित
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
भारतीय क्रिकेट रसिकांना आता विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे वेध लागले आहेत. भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 4 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान भारतातील 10 शहरांमध्ये वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. स्पर्धेचा उद्घाटन आणि अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.दुसऱ्या दिवशी याच स्टेडियममध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सलामीचा सामनाही होणार आहे. 2019 मध्ये याआधीच्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीतही दोन्ही संघ आमनेसामने आले होते.12 वर्षांनंतर आशियामध्ये एकदिवसीय विश्वचषक होत आहे. यापूर्वी 2011 मध्ये भारत, श्रीलंका आणि बांगलादेश यांनी संयुक्तपणे विश्वचषक आयोजित केला होता.
गेल्यावेळेप्रमाणे यंदाही विश्वचषक राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत 10 संघ सहभागी होणार आहेत. उद्घाटन समारंभात सर्व 10 संघांचे कर्णधार अहमदाबादमध्ये उपस्थित राहणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ‘कॅप्टन डे’ कार्यक्रमात सर्व कर्णधारांचे एक छोटेसे औपचारिक सत्र देखील आयोजित करेल.
उद्घाटन समारंभात आयसीसी कार्यकारी मंडळाचे सदस्यही उपस्थित राहणार आहेत. ICC सोबत, यजमान भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) चे कार्यकारी मंडळ सदस्य देखील उद्घाटन समारंभाचा भाग असतील.
उद्घाटन समारंभादरम्यान, 6 संघांच्या कर्णधारांना घाईघाईने अहमदाबादला पोहोचावे लागेल कारण 6 संघ समारंभाच्या एक दिवस आधी म्हणजे 3 ऑक्टोबर रोजी इतर कोणत्यातरी शहरात सराव सामने खेळणार आहेत. अशा परिस्थितीत सामना संपताच या संघांच्या कर्णधारांना अहमदाबादला रवाना व्हावे लागणार आहे. दुसरीकडे, उर्वरित 4 संघांचे कर्णधार 4 ऑक्टोबरलाच सकाळी अहमदाबादला पोहोचतील.
3 ऑक्टोबरला तिरुवनंतपुरममध्ये भारत-नेदरलँड्स, हैदराबादमध्ये ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान आणि गुवाहाटीमध्ये श्रीलंका-अफगाणिस्तान यांच्यात सराव सामने होणार आहेत. म्हणजेच भारताकडून कर्णधार रोहित शर्मा, नेदरलँडचा स्कॉट एडवर्ड्स, ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स, पाकिस्तानचा बाबर आझम, श्रीलंकेचा दासून शनाका आणि अफगाणिस्तानचा हसमतुल्ला शाहिदीला सामना संपताच अहमदाबाद गाठावे लागणार आहे.
SL/KA/SL
28 Aug 2023