लडाखमध्ये पाच नव्या जिल्ह्यांची निर्मिती, केंद्र सरकारचा निर्णय
पर्यटनासाठी आवडीचं डेस्टीनेशन असलेल्या लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे तयार करण्यात येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी या संदर्भात घोषणा केली. सुलभ प्रशासनासाठी हा निर्णय गृह मंत्रालयाने घेतल्याची माहिती आहे.या घोषणेनुसार झांस्कार, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग या पाच नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली आहे. झांस्कार आणि द्रास हे नवे जिल्हे कारगिल विभागात असतील. तर शाम, नुब्रा आणि चांगथांग हे जिल्हे लेह विभागात आहेत.एक्स अकाऊण्टवर अमित शाह यांनी घोषणा करताना म्हटले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार विकसित आणि समृद्ध लडाख बनवण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृह मंत्रालयाने लडाख या केंद्रशासित प्रदेशात पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकार लडाखच्या नागरिकांसाठी मुबलक संधी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही अमित शाह यांनी म्हटले आहे. लडाखमध्ये सध्या लेह आणि कारगिल हे दोनच जिल्हे आहेत. दोन्ही जिल्ह्यांमध्ये त्यांच्या स्वायत्त जिल्हा परिषदा आहेत. नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीनंतर लडाखमध्ये एकूण सात जिल्हे असतील.