#कोविडमुळे रेल्वेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम, हजारो रेल्वे कर्मचार्‍यांनाही साथीची लागण

 #कोविडमुळे रेल्वेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम, हजारो रेल्वे कर्मचार्‍यांनाही साथीची लागण

नवी दिल्ली, दि.19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोविड साथीने शंभर वर्षात पहिल्यांदाच रेल्वेची चाके इतक्या दीर्घ काळासाठी खिळवून ठेवली आहेत. भारताची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या रेल्वेचे कोविड-19 ने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. प्रवासी गाड्यांद्वारे होणार्‍या रेल्वेच्या उत्पन्नामध्ये 87 टक्क्यांची घट झाली आहे. कोविडमुळे सध्या केवळ 1089 विशेष गाड्या धावत आहेत. रेल्वेच्या सुमारे 30 हजार कर्मचार्‍यांना काम करत असताना कोविडचा संसर्ग झाला आहे.
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी सांगितले की, राज्य सरकारांच्या समन्वयाने गाड्या चालवल्या जातील. ते म्हणाले की कोरोना लक्षात घेता हळूहळू गाड्यांचे वेळापत्रक नियमित करण्यात येत आहे. सध्या देशभरात एक हजाराहून अधिक गाड्या धावत आहेत. रेल्वेचे प्रवासी गाड्यांच्या उत्पन्नात मोठे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी रेल्वेला प्रवासी गाड्यांमधून 53 हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावेळी आतापर्यंत केवळ 4500 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. प्रवासी गाड्यांच्या उत्पन्नात 87 टक्क्यांची घट झाली आहे. त्याचवेळी मालवाहतू्कीचा महसूल 9000 कोटींनी कमी झाला आहे.
रेल्वे फ्रेट म्हणजेच मालगाड्यांद्वारे सध्या केवळ 27 टक्के सामानच जात आहे, आता 2030 पर्यंत ते 45 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा विचार आहे. 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन कमी करून सौर पॅनेलद्वारे जास्तीतजास्त वीज निर्मिती करण्याचा हेतू आहे.
व्ही.के.यादव यांनी सांगितले की, सर्व प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचवण्यासाठी कन्फर्म तिकीट दिले जावे हे रेल्वेचे उद्दीष्ट आहे. सध्या दरवर्षी कोट्यावधी तिकिटे कन्फर्म होत नसल्यामुळे रद्द होत असतात. जर ती कन्फर्म झाली तर रेल्वेचे उत्पन्नही वाढेल.
Tag-Covid-19/Railway/Income/Reduced
PL/KA/PL/19 DEC 2020

mmc

Related post