कोविड काळात मुंबई महानगरपालिकेने केलेले कार्य जगात अतुलनीय

 कोविड काळात मुंबई महानगरपालिकेने केलेले कार्य जगात अतुलनीय

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोविड काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कामगार – कर्मचारी – अधिकाऱ्यांनी अथक आणि अविरत काम करून कोविडशी दिलेला लढा हा जगात अतुलनीय आहे. त्यामुळेच ‘मुंबई माॅडेल’ म्हणून सुप्रसिद्ध झालेल्या या लढ्याची अत्यंत समर्पक आणि प्रभावी नोंद ओघवत्या शैलीत घेणाऱ्या सुरेश काकाणी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन स्वच्छता कामगार, आशा सेविका, वॉर्ड बॉय, नर्स आणि डॉक्टर यांच्या हस्ते होणे, ही बाब निश्चितच चपखल आणि कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांनी काढले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.या कार्यक्रमाला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त (आरोग्य) संजय कुऱ्हाडे, संचालक (आरोग्य शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉक्टर नीलम अंद्रादे, शीव येथील लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉक्टर मंगला गोमारे, सह आयुक्त (आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, ग्रंथाली प्रकाशनाचे सुदेश हिंगलासपूरकर आणि मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ‘लढा मुंबईचा कोविडशी’ या पुस्तकाचे प्रकाशन हे प्रचलित पद्धतीने न करता जरा वेगळ्या पद्धतीने करण्यात आले. या अंतर्गत ज्यांनी कोविड विरोधातील लढ्यात प्रत्यक्ष भाग घेतलेला, अशांच्या प्रतिनिधींनी या पुस्तकाचे प्रकाशन केले. यामध्ये महानगरपालिकेच्या ‘सी’ विभागात काम करणारे स्वच्छता कामगार संदेश जाधव, जिजामाता नगर मध्ये आशा सेविका म्हणून कार्यरत असणाऱ्या श्रीमती मनीषा कांबळे, सेवन हिल्स रुग्णालयात ‘वॉर्ड बॉय’ म्हणून काम करणारे प्रवीण परब, शिव रुग्णालयातील अधिपरिचारिका (नर्स) श्रीमती वैशाली पालये आणि कस्तुरबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चंद्रकांत पवार यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तकाचे प्रकाशन ज्यांच्या हस्ते झाले त्या सर्वांनीच पुस्तक प्रकाशित करण्याचा बहुमान दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. तसेच हा सन्मान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कामगार कर्मचारी व अधिकाऱ्यांचा असल्याचेही सर्वांनीच नमूद केले.या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना पुस्तकाचे लेखक सुरेश काकाणी यांनी मुंबईसारख्या लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या शहरात कोविड विषाणूचा मुकाबला करणे, हे अत्यंत मोठे आव्हान होते. तथापि, बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिवस रात्र एक करून केलेल्या कामांमुळे मुंबईचा कोविड विरोधातील लढा हा यशस्वी झाला असल्याचे सांगतानाच या लढ्याचे श्रेय हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या चमूला असून ‘लढा मुंबईचा कोविडशी’ हे पुस्तक आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संपूर्ण चमूला अर्पण केले असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

ML/KA/PGB 19 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *