आदिपुरुषच्या निर्मात्यांना न्यायालयाकडून ताकीद

 आदिपुरुषच्या निर्मात्यांना न्यायालयाकडून ताकीद

लखनऊ, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिनेमा हा समाजाचा आरसा आहे असं म्हटलं जातं. येणाऱ्या पिढ्यांना तुम्ही काय शिकवणार आहात? सेन्सॉर बोर्डाला त्यांची जबाबदारी समजत नाही का? कोर्टाने हे देखील म्हटलं आहे की रामायण, कुराण, गुरु ग्रंथसाहेब, भगवद्गीता यांसारख्या धार्मिक ग्रंथाना तरी सोडा. अशा कठोर शब्दांत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठानं आदिपुरुष चित्रपटाच्या निर्मात्यांचा समाचार घेतला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी आता २७ जून रोजी होणार आहे. मनोज मुंतशीर यांना वादी करायचं की नाही यावरही सुनावणी होणार आहे.

पात्र निवड, कथा, संवाद आणि VFX अशा सर्वच पातळ्यांवर प्रेक्षकांच्या टिकेस पात्र ठरलेल्या आदिपुरुष चित्रपटावरून निर्माण झालेला वादंग आठवडा उलटला तरीही शमलेला नाही. या सिनेमातले काही संवाद बदलण्यातही आले आहेत. मात्र प्रेक्षकांचं हे म्हणणं आहे की रामायणासारख्या धर्मग्रंथाचा हा अपमान आहे. या सिनेमाच्या विरोधात वकील कुलदीप तिवारी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात याचिका दाखल केली होती. याविषयीची सुनावणी आज झाली त्यात कोर्टाने आदिपुरुषच्या निर्मात्यांना फटकारलं आहे.

सेन्सॉर बोर्डाचे मौन कायम
आदिपुरुषच्या विरोधात जी याचिका दाखल करण्यात आली होती त्याविषयी न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान आणि न्यायमूर्ती श्रीप्रकाश सिंह यांच्या डिव्हिजन बेंचने सुनावणी केली. वरिष्ठ वकील रंजना अग्निहोत्री यांनी बाजू मांडत सिनेमातले आक्षेपार्ह संवाद आणि चुकीचे प्रसंग याबाबत न्यायालयाला माहिती दिली. २२ जून रोजी याविषयीची याचिका दाखल करण्यात आली होती. यानंतर कोर्टाने वकील अश्विनी सिंह यांना विचारलं की सेन्सॉर बोर्ड काय करतं आहे?

सिनेमाचे निर्माते, दिग्दर्शक सुनावणीला अनुपस्थित
कोर्टाने आज आदिपुरुष या सिनेमाचे निर्माते, दिग्दर्शक आणि अन्य प्रतिवादी हे कोर्टात उपस्थित का नाहीत? असाही प्रश्न उपस्थित केला. रंजना अग्निहोत्रींनी कोर्टाला हेदेखील सांगितलं की अद्याप याविषयीचं उत्तर सेन्सॉर बोर्डानेही दिलेलं नाही. तसंच सिनेमात रावण वटवाघुळाला मांस खाऊ घालताना दाखवला आहे, सीतेला स्लीव्हलेस ब्लाऊजमध्ये दाखवलं गेलं आहे, वटवाघुळ म्हणजेच रावणाचं विमान दाखवलं आहे, काळ्या रंगाची लंका, सुषेण वैद्याचा उल्लेख न करणं, बिभीषणाच्या पत्नीने लक्ष्मणाला संजीवनी देणं अशा आक्षेपार्ह प्रसंगांवरही आक्षेप घेतला आहे.

SL/KA/SL

26 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *