न्यायालयाने गोठवले औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचे बँक खाते

बीड,दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अंबाजोगाई दिवाणी न्यायालयाने परळी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राबाबत अत्यंत महत्त्वाचा आदेश दिला आहे. या आदेशानुसार विद्युत निर्मिती केंद्राचे बँक ऑफ महाराष्ट्रचे बँक खाते गोठवले जाणार आहे.परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव या ठिकाणी 250 मेगावॅट विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन करण्यात आल्या होत्या. मात्र शेतकऱ्यांना जमिनीचा मावेजा अत्यल्प दिल्याने शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. यानुसार न्यायालयाने 2022 मध्ये शेतकऱ्यांना वाढीव मावेजा मंजूर केला होता. हा मावेजा संबंधित शेतकऱ्यांना विद्युत निर्मिती केंद्राकडून देण्यात आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी न्यायालयात वसुली अर्ज दाखल केला होता.
यावर सुनावणी करत परळीतील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखा व्यवस्थापकांना पुढील आदेशापर्यंत हे खाते गोठवण्याचे निर्देश दिले आहेत. परळीत महानिर्मितीचे औष्णिक वीज केंद्र आहे.औष्णिक विद्युत केंद्रात कोळश्यापासून वीजनिर्मिती केली जाते. या औष्णिक वीज केंद्रातून दररोज राख निर्मिती होते. या राखेची अधिकृत आणि अनधिकृत वाहतूक होत असते, यावरून चांगलंच राजकारण तापलेलं आहे.
SL/ML/SL
19 Feb. 2025