‘रेमडेसिवीर’ची बेकायदेशीर विक्री करणाऱ्याना न्यायालयाने नाकारला जामीन

मुंबई, दि. १८ : कोविड-१९ साथ आजार दरम्यान परवाना नसताना रेमडेसिवीर औषधांची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी समीर खान याला सत्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला आहे. खान मागील तीन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभय अविनाश जोगळेकर यांनी खानचा जामीन अर्ज फेटाळून लावला. खानने आपल्याला सह-आरोपी किशोर गुप्ता याला मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडे दिलेल्या जामीनाच्या आधारे समानतेच्या आधारावर जामीन मागितला होता. मात्र, खानला तशी सूट लागू होत नाही, असे सत्र न्यायालयाने स्पष्ट केले.
लांबलेल्या नजरकैदेचा मुद्दा खानने उपस्थित केल्यानंतर, त्याच्यावरील आरोपाबाबत जन्मठेपेची तरतूद आहे आणि अशा प्रकरणात आरोपीने अर्धी शिक्षा भोगल्यावरच दीर्घ कैदेच्या आधारे सवलत देता येते, असे न्यायालयाने नमूद केले.
खानविरोधात २०२१ मध्ये सायबर पोलिसांनी फसवणूक व बनावट दस्तावेज तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. काही अज्ञात व्यक्ती परवाना नसताना हे औषध विकत आहेत, अशी तक्रार सिप्ला लिमिटेड या रेमडेसिवीर औषध तयार करणाऱ्या औषध कंपनीने केली होती. या व्यक्ती सामान्य नागरिकांकडून ऑनलाइन ऑर्डर घेऊन पैसे स्वीकारून फसवणूक करत होत्या, असेही आरोप आहेत.