पतंजली च्यवनप्राशच्या जाहिरातीवर न्यायालयाकडून बंदी

नवी दिल्ली, दि. ३ : दिल्ली उच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेदला डाबर च्यवनप्राशविरुद्ध कोणतीही नकारात्मक किंवा दिशाभूल करणारी जाहिरात दाखवू नये असे निर्देश दिले आहेत. डाबरने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर न्यायमूर्ती मिनी पुष्कर्ण यांनी हा आदेश दिला. तसेच सध्या पतंजली च्यवनप्राशच्या जाहिरातीवर बंदी घालण्यात आली आहे
आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ जुलै रोजी होणार आहे. या प्रकरणात डाबरचे प्रतिनिधित्व ज्येष्ठ वकील संदीप सेठी यांनी केले, तर पतंजलीच्या वतीने वरिष्ठ वकील राजीव नायर आणि जयंत मेहता यांनी हजेरी लावली. संदीप सेठी म्हणाले,
पतंजली त्यांच्या च्यवनप्राश उत्पादनाला “सामान्य” आणि आयुर्वेदाच्या परंपरेपासून दूर असल्याचे दाखवून त्याची प्रतिमा खराब करत आहे. या जाहिरातीत स्वामी रामदेव स्वतः असे म्हणताना दिसत आहेत की, “ज्यांना आयुर्वेद आणि वेदांचे ज्ञान नाही ते पारंपारिक च्यवनप्राश कसे बनवू शकतात?”
डाबरने न्यायालयात युक्तिवाद केला की अशा जाहिराती त्यांच्या उत्पादनाची केवळ बदनामी करत नाहीत तर ग्राहकांची दिशाभूल देखील करतात. त्यांनी म्हटले की च्यवनप्राश हे एक पारंपारिक आयुर्वेदिक औषध आहे, जे औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायद्यांतर्गत नियमांनुसार तयार केले पाहिजे. अशा परिस्थितीत, इतर ब्रँडना सामान्य म्हणणे चुकीचे, दिशाभूल करणारे आणि हानिकारक आहे.