देशातील सर्वात वयोवृद्ध वाघिणीचा मृत्यू

 देशातील सर्वात वयोवृद्ध वाघिणीचा मृत्यू

अलवार, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्यावरण साखळीत सर्वोच्च स्थान असणाऱ्या देशातील वाघांच्या मागे लागलेले नष्टचर्य गेल्या १५ दिवसांपासून सुरु आहे. गेल्या पंधरवड्यात पाच वाघ मृत्यूमुखी पडले.आतच आता अजून एका वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या वाघिणीचे वैशिष्ट्य म्हणजे ही देशातील सर्वांत वयोवृद्ध वाघिण आहे.राजस्थानातील अलवार जिल्ह्यातील सारिस्का व्राघ्र प्रकल्पातील वाघीण एसटी-२ चा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आज तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सरिस्का येथील वाघांची संख्या पुन्हा वाढवण्याची जबाबदारी या वाघिणीने पार पाडली होती. सरिस्का व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक आर. एन. मीणा यांनी या वाघिणीच्या मृत्युमुळे अभयारण्याचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले. एसटीआरमधील ३० वाघांपैकी २५ वाघ एसटी-२ चे वंशज असल्याचे त्यांनी सांगितले.

“एसटी २ या वाघिणीच्या शेपटीवर जखम झाली होती. गेल्या तीन महिन्यांपासून तिला पिंजऱ्यात ठेवून उपचार सुरू होते. मंगळवारी सायंकाळी वाघिणीची कोणतीही हालचाल दिसून न आल्याने डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले”, अशी माहिती जिल्हा वनअधिकारी डी. पी. जगवत यांनी दिली.वन कर्मचाऱ्यांचे पथक २४ तास तिच्यावर सतत लक्ष ठेवून होते. अभयारण्यातील वाघांची संख्या वाढविण्यात १९ वर्षीय वाघिणीजबाबदार होती. २००८ मध्ये तिला रणथंभोर व्याघ्र प्रकल्पातून सरिस्का येथे स्थलांतरित करण्यात आले. तेव्हापासून तिने एसटी ७, एसटी ८ आणि एसटी १४ आणि एसटी १३ या वाघिणींना जन्म दिला.

वनमंत्री संजय शर्मा यांनी वाघिणीची काळजी घेतल्याबद्दल वनअधिकाऱ्यांचे कौतुक केले. “साधारणपणे वाघांचे आयुष्य १४ ते १५ वर्षे असते. पण एसटी- २ वाघीण १९ वर्षे जगली. या वाघिणीला श्रद्धांजली वाहण्यासाठी मी आलो आहे. आम्ही जशी आपल्या वृद्धांची काळजी घेतो, तशीच या वनाधिकाऱ्यांनी वाघिणीची शेवटच्या दिवसात काळजी घेतली. आता लवकरच रणथंभौर आणि मध्य प्रदेशातून आणखी वाघ सरिस्कायेथे आणण्याची आमची योजना आहे”, असे वनमंत्री म्हणाले.

SL/KA/SL

10 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *