मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांना ‘इपॉक्सी’ पद्धतीने देणार गंजप्रतिरोधक मुलामा

 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांना ‘इपॉक्सी’ पद्धतीने देणार गंजप्रतिरोधक मुलामा


मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱया तीन मुख्य जलवाहिन्यांवर २८ किमी लांबीच्या जल वाहिन्यांना गंजप्रतिरोधक असा त्रिस्तरीय मुलामा देण्यासाठी जलअभियंता विभागाने कार्यवाही सुरु केली असून इपॉक्सी पद्धतीच्या वापराने हा मुलामा दिला जाईल. या पद्धतीच्या वापराने जलवाहिन्यांचे आयुर्मान वाढण्यास मदत होणार आहे .
अघाई ते पाच्छापूर आणि तानसा ते पाच्छापूर दरम्यानची अप्पर वैतरणा , वैतरणा प्रमुख जलवाहिन्या तसेच ताराली ते गुंदवली दरम्यानच्या नवीन तानसा या मुख्य जलवाहिन्यांना गंजप्रतिरोधक त्रिस्तरीय ‘इपॉक्सी’ रंगकाम करण्यात येणार आहे. जलवाहिन्यांना गंज चढू नये आणि त्यांचे आयुर्मान वाढावे यासाठी हे ‘इपॉक्सी’ रंगकाम केले जाणार आहे. या दोन्ही जलवाहिन्यांना इपॉक्सी रंगकाम केल्यामुळे येत्या काळात गंज लागण्यापासून सुरक्षित राहतील, जलवाहिन्यांचे आयुर्मानही वाढणार आहे.

मुंबई शहराला अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांतून दररोज सुमारे ३९०० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणीपुरवठा होतो. पैकी विहार व तुळशी वगळता उर्वरित पाच जलाशय हे मुंबईच्या हद्दीबाहेर अर्थात नगरबाह्य विभागात मोडतात. तिथून सुमारे सव्वाशे ते दीडशे किलोमीटर अंतरावरुन मुंबईपर्यंत पाणी वाहून आणताना अतिशय मोठ्या आकाराच्या अशा मुख्य जलवाहिन्यांवर पुरवठ्याची मोठी भिस्त असते. यामध्ये अप्पर वैतरणा २७५० मीमी , वैतरणा २४०० मिमी, तानसा २७५० मिमी, मध्य वैतरणा ३००० मिमी, मुंबई-२ ही २३४५ मिमी , मुंबई-३ ही ३००० मिमी आणि २२३५ मिमी मुख्य जल वाहिनी यांचा समावेश आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया या जलवाहिन्यांचे बाह्य विभागामध्ये सुमारे ३८० किलोमीटर अंतराचे अतिशय मोठे असे जाळे आहे. या जलवाहिन्या जंगल परिसर, दुर्गम तथा ग्रामीण भागातून तसेच भिवंडी आणि ठाणे खाडीतून विस्तारत मुंबईच्या दिशेने अंथरलेल्या आहेत. तसेच बहुतांश अंतरात त्या जमिनीखाली देखील आहेत. या जलवाहिन्यांवर माती, गाळ, दमट हवामान, कचरा तसेच पाणी आणि इतर रसायने यांचा प्रतिकूल परिणाम होत असतो. परिणामी या जलवाहिन्यांना गंज चढण्याचीदेखील शक्यता असते. स्वाभाविकच, या जलवाहिन्यांची नियमितपणे देखभाल-दुरूस्ती करणे क्रमप्राप्त असते. या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभाग अंतर्गत नगरबाह्य विभागाकडून या जलवाहिन्यांची सातत्याने पाहणी करण्यात येते आणि नियमितपणे डागडुजी देखील केली जाते. जलवाहिन्यांच्या सुरक्षिततेसह त्यांचे आयुर्मान वाढविण्यासाठीदेखील वेळोवेळी प्रयत्न केले जातात.

यामध्ये अपर वैतरणा २७५० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर आघई ते पाच्छापूर या १० किलोमीटर अंतरात, वैतरणा २४०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर तानसा ते पाच्छापूर या १५ किलोमीटर अंतरात आणि नवीन तानसा ३००० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर ताराळी ते गुंदवली दरम्यान ३.५ किलोमीटर अशा एकूण सुमारे २८ किलोमीटर अंतराच्या वाहिन्यांना इपॉक्सी पद्धतीने त्रिस्तरीय मुलामा दिला जाईल. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यापूर्वी २०१६-२०१७ मध्ये या तिनही वाहिन्यांवर गंजप्रतिरोधक सुधारणा करण्यात आली होती.

ML/KA/PGB
30 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *