चीनमध्ये कोरोनामुळे हाहाकार
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दोन वर्षांपूर्वी जगभरात कोरोनाचा प्रसार होण्यास कारणीभूत ठरलेल्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनामुळे हाहाकार माजला आहे.चीनमध्ये कोरोनावरील निर्बंध शिथिल केल्यानंतर तेथे संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत आहे. बीजिंगमधील स्मशानभूमीत 24 तास अंत्यसंस्कार केले जात आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, त्यासाठीची प्रतीक्षा यादी 2000 वर पोहोचली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे दिवसात नव्हे तर तासांत दुप्पट होत आहेत.
आपल्या लोकसंख्येपैकी 90% नागरिकांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे. असा दावा चीन करत असले तरीही 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या केवळ 50% लोकांना पूर्णपणे लसीकरण केले गेले आहे. त्यांना गंभीर संसर्ग होण्याची भीती असते.
झिरो-कोविड पॉलिसी रद्द केल्यानंतर कोरोनाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, रुग्णालयातील सर्व खाटा तुडुंब भरल्या आहेत. औषधे नाहीत, जिथे आहेत तिथे लांबच लांब रांगा लावाव्या लागतात.
अमेरिकन शास्त्रज्ञ आणि महामारी तज्ज्ञ एरिक फेगल-डिंग यांनी सोशल मीडियावर चीनचा धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये रुग्णालये, स्मशानभूमी आणि मेडिकल स्टोअर्सची चिंताजनक स्थिती दिसून येत आहे. त्यांनी कोरोनाबाबत मोठा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, 90 महिन्यांत चीनची 60% लोकसंख्या आणि जगातील 10% लोकांना कोरोनाची लागण होईल. जवळपास 10 लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. नुकताच अमेरिकेच्या इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन (IHMI) नेही असाच अंदाज वर्तवला होता.
SL/KA/SL
20 Dec. 2022