पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक वेगवान होण्यासाठी समन्वयाने कार्यवाही

 पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक वेगवान होण्यासाठी समन्वयाने कार्यवाही

मुंबई दि.23(एम एमसी न्यूज नेटवर्क): पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सुरळीत आणि वेगवान होण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मेट्रो, वाहतूक पोलीस यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी. बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतून जाणारा २६ किलोमीटर लांबीचा पश्चिम द्रुतगती महामार्ग खड्डेमुक्त असला तरी रस्त्याची गुणवत्ता अधिक चांगली करावी. पावसाळी पाण्याचा निचरा योग्य प्रकारे करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. दुतगती महामार्गावरील रस्ते दुभाजक, पदपथ सुस्थितीत असावेत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

पश्चिम द्रुतगती महामार्गास भेट देऊन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी आज वाहतुकीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी के पूर्व विभागात बैठक घेतली. सहपोलीस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे , पोलीस उपआयुक्त (वाहतूक) मितेश घट्टे, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, उप आयुक्त (परिमंडळ ३) विश्वास मोटे, सहायक आयुक्त (के पूर्व) मनीष वळंजू, प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) गिरीश निकम यांच्यासह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महानगरपालिका आयुक्त श्री. गगराणी म्हणाले की, पश्चिम द्रुतगती महामार्ग महानगरपालिकेच्या नऊ विभाग हद्दीतून जातो. या महामार्गावरील काही उड्डाणपूल एमएसआरडीसी यांच्या अखत्यारित आहेत. हा महामार्ग बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे अलीकडेच हस्तांतरित झाला आहे. या महामार्गाची देखभाल दुरुस्ती, डागडुजीची जबाबदारी महानगरपालिकेकडे आली आहे. प्रत्येक विभाग हद्दीत पदपथ, रस्ते दुभाजक, कडठे यांची रचना भिन्न स्वरूपाची आहे. त्यात एकसमानपणा यायला हवा. त्यासाठी रस्ते विभागाने धोरण तयार करावे. त्याची अंमलबजावणी विभाग कार्यालयांनी करावी, अशी सूचना श्री. गगराणी यांनी केली.

वांद्रे ते दहिसर या पंचवीस किलोमीटर लांबीच्या महामार्गाची गुणवत्ता सुधारण्यास वाव आहे. काही ठिकाणी पृष्ठीकरण करता येईल. रस्ते दुभाजक सुस्थितीत आणि रंगकाम केलेले असावेत. आवश्यक त्या ठिकाणी एकसारखे कठडे (रेलींग) करावे, जेणेकरून वाहतुकीला अडथळा येणार नाही. महामार्गाच्या दुतर्फा सुशोभीकरण करणे शक्य आहे का, याचा आढावा घ्यावा. रस्ते दुभाजक, पदपथांच्या दगडी कडा यांची नियमितपणे स्वच्छता करावी. रस्ते दुभाजकांना आकर्षक रंगसंगती करावी. दुभाजकांमध्ये हिरवळीची लागवड करावी. आवश्यक त्या ठिकाणी पादचाऱ्यांसाठी झेब्रा क्रॉसिंग करावे. ही सर्व कार्यवाही विभाग स्तरावर होणे अपेक्षित आहे, असे देखील श्री. गगराणी यांनी नमूद केले.

पावसाळी पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यासाठी आतापासूनच उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश देत पुढे ते म्हणाले की, काही ठिकाणी जोरदार पावसावेळी पाणी साचत असल्याचे निदर्शनास आले आहे. महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाने संबंधित विभाग कार्यालय आणि रस्ते विभाग यांच्याशी समन्वय साधून तातडीने उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. पावसाळ्यापूर्वी ही कामे होणे गरजेचे आहे. नागरिक, प्रवासी यांना कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. सांडपाणी वाहणाऱ्या नलिका बंदिस्त असाव्यात. त्या खुल्या असता कामा नये. महामार्गावरील ड्रेनेजची झाकणे मजबूत असावीत. महामार्गासह उड्डाणपूल, भुयारी मार्ग याठिकाणी पथदिवे सुस्थितीत असावेत. रस्ते गुणवत्ता सुधारण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी मुक्त महामार्ग होण्यासाठी महानगरपालिका, वाहतूक पोलीस, एमएसआरडीसी यांनी समन्वयाने कामकाज केले पाहिजे, असे देखील श्री. गगराणी म्हणाले.

रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पासाठी महानगरपालिका पवई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) यांचे सहकार्य घेत आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर विविध उपाययोजना राबवण्यासाठी देखील आयआयटीचे सहकार्य घेता येईल, असे सुचवून श्री. गगराणी म्हणाले की, आजच्या बैठकीत पश्चिम द्रुतगती महामार्गावरील अनधिकृत जाहिरात फलक, अनधिकृत वाहनतळ या मुद्द्यांवर देखील चर्चा झाली. वाहतूक पोलिसांनी रस्त्यांच्या कडेला आढळणाऱया बेवारस वाहनांची विल्हेवाट लावावी, वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सूचना कराव्यात. रस्ते विकास कामांना वाहतूक पोलिसांनी ना-हरकत प्रमाणपत्र विनाविलंब द्यावे, दिशादर्शक फलक उभारावेत, अशा देखील सूचना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. गगराणी यांना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

SW/ML/SL

23 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *