कॉबॅक्टक्ट आर्मी एव्हिएशनचे दीक्षांत संचलन

 कॉबॅक्टक्ट आर्मी एव्हिएशनचे दीक्षांत संचलन

नाशिक, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) भारतीय सेना दलाच्या हवाई तुकडीतील लढाऊ हेलिकॉप्टर पायलटना प्रशिक्षण देणाऱ्या कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल अथवा कॅट्स च्या प्रशिक्षण केंद्रातील 37 व 38 व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज नाशिक रोड जवळच्या गांधीनगर एअरफील्डवर दिमाखात संपन्न झाला .

एका नायजेरियन अधिकाऱ्यासह 32 अधिकाऱ्यांना कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर पायलट म्हणून एव्हिएशन विंगकडून सन्मानित करण्यात आले. यात महिला पायलट अधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

आजच्या दीक्षांत संचलन समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे नायजेरियन लष्कराच्या अधिकाऱ्याला देखील या केंद्रात प्रशिक्षित करण्यात आले असून या अधिकाऱ्याला देखील आजच्या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले याशिवाय मानव रहित ड्रोन पायलट चे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

आर्मी एव्हिएशन कोर्सचे महानिर्देशक आणि कर्नल कमांडट लेफ्टनंट जनरल अजय कुमार सूरी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या प्रशिक्षणात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना बॅच आणि विविध प्रकारच्या ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

या प्रशिक्षणातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या सिल्वर चित्ता ट्रॉफी पटकविण्याचा मान कॅप्टन नमन बंसल यांना मिळाला मेजर अभिमन्यू गणाचारी , मेजर नवनीत जोशी, लेफ्टनंट कर्नल पुनीत नागर यांनीही या प्रशिक्षणात मानाच्या ट्रॉफी पटकविल्या यावेळी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी म्हणाले की गेल्या काही वर्षापासून सैन्य दलातील वैमानिकांच्या प्रशिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरण होत असून भावी काळात सैन्यामध्ये सध्या वापरात असलेल्या चित्ता चेतक ध्रुव या हेलिकॉप्टर्स पेक्षा ही प्रगत अशी इतर हेलिकॉप्टर समाविष्ट होणार आहेत.

ही हेलिकॉप्टर युद्ध आणि आपत्ती काळात चालविण्याचे प्रशिक्षण या केंद्रातून प्रशिक्षणार्थींना देण्यात येईल ,अलीकडच्या युद्धामध्ये मानव रहित ड्रोन किंवा हेलिकॉप्टर महत्वाची भूमिका बजावत असून त्यामध्ये पुढील काळात अधिकाधिक सुधारणा होईल. या मानव रहित वाहनांचा युद्धभूमीवर वापर आणि त्या संदर्भातील प्रशिक्षण यांची भूमिका महत्त्वाची असून सैन्यातील वैमानिकांना आव्हानात्मक परिस्थितीचा मुकाबला यशस्वी करता यावा यादृष्टीने प्रशिक्षणामध्ये बदल आवश्यक ठरणार आहे .

अनेक वर्षाच्या परंपरेप्रमाणे होणाऱ्या सोहळ्यात यावर्षी काही लाक्षणिक बदल करण्यात आले होते. दीक्षांत संचालनाची सुरुवात लष्कराच्या बँड पथकाच्या तालावर प्रशिक्षणार्थींच्या संचालनाने आणि मानवंदनेने झाली. प्रमुख पाहुणे आणि मान्यवर अतिथींना लष्करात सध्या कार्यरत असलेल्या चित्ता, चेतक, ध्रुव या हेलिकॉप्टरने आकाशातून सलामी दिली.

पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर युद्धभूमीवर व अतिरेकी कारवायांमध्ये लढाउ हेलिकॉप्टर्स आणि पायलट यांच्या कार्याचे प्रदर्शन घडविणारे प्रात्यक्षिक आणि हेलिकॉप्टर्स पायलट आणि सैनिकांचे रोमहर्षक प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच आकाशातून तिरंगा घेऊन उडणाऱ्या हेलिकॉप्टर्सला सलामी देण्यात रिमोट ऑपरेटेड मॉडेलचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले .दीक्षांत समारंभाला लष्करातील वरिष्ठ अधिकारी पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी लष्करी शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि प्रशिक्षणार्थींचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1 Dec.2022

ML/KA/SL

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *