दिल्लीत मुघलकालीन सुनहरी मशिदीवरुन वादंग

 दिल्लीत मुघलकालीन सुनहरी मशिदीवरुन वादंग

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

राजधानी नवी दिल्लीत वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या सुनहरी बाग मशीद हटवण्याच्या विषयावरून वादंग निर्माण झाला आहे. हवाई दलाचे मुख्यालय व उद्योग भवनाजवळील चौकात असलेली सुनहरी बाग मशीद वाहतुकीला अडथळा येतो, या कारणावरून हटवण्याच्या प्रस्तावाबाबत नवी दिल्ली महापालिका-परिषदेने (एनडीएमसी) मते, सूचना आणि हरकती मागवणारी सार्वजनिक सूचना जारी केल्याने वाद उफाळला आहे. महापालिकेने ही सूचना तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी माकपसह अनेक पक्षांनी केली आहे.

ल्यूटियन्स दिल्लीत रफी (अहमद किदवई) मार्गावरील ही मुघलकालीन मशीद पाडण्याच्या प्रस्तावाला वाढता विरोध होत आहे. ही मशीद पंतप्रधानांच्या महत्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या आराखड्यात येते. मात्र हीच नव्हे तर नवीन संसद भवनाच्या अगदी समोरची मशीद, शेजारीच असलेली माजी राष्ट्रपती झाकीर हुसेन यांची मजार, पटेल चौकतील जुनी मशीद आणि अकबर रस्ता – कर्तव्यपथाच्या चौकातील मशिदीसह या परिसरातील किमान ८ ते ९ दर्गे व मशिदी, ज्या सेंट्रल व्हिस्टाच्या थेट नकाशात येतात त्यांचे केंद्र सरकार काय करणार आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कस्तुरबा गांधी मार्गावर भारतीय विद्याभवनाच्या गोल चक्करवरील मशिदीसह दिल्लीतील काही चौकांत व गोल चक्करच्या मधोमधही अनेक मशिदी, मंदिरे व दर्गे आहेत. सुनहरी मशीद पाडण्याच्या प्रस्तावावर केवळ मुस्लिम समाजच नव्हे तर काही इतिहासकारही विरोधात आहेत.

जमियत उलेमा-ए-हिंदचे प्रमुख अर्शद मदनी यांनी म्हटले आहे की आम्ही सुनेहरी बाग मशिदीसाठी प्रत्येक कायदेशीर लढाई लढू, मशीद पाडणे हे एक कारस्थान आहे. सुनहरी मशीद हटवण्या संदर्भात महापालिकेला मुस्लिम संघटना आणि अल्पसंख्याक कल्याणकारी संस्थांच्या आतापावेतो २००० हून अधिक टिप्पण्या आणि सूचना मिळाल्या आहेत. सुनहरी मशीद या भागातील वाहतुकीत अडथळा आणत आहे हा तर्क मुस्लिम संघटनांनी फेटाळला आहे.

ओवैसी व इतरांच्या मते ही मशीद ही सुनहरी बागेच्या चौकातच व्यवस्थितपणे उभी आहे आणि तिच्या संरचनेमुळे या चौकात एकत्र येणाऱ्या पाचही रस्त्यांवर कोणताही अडथळा येत नाही. शिवाय, शुक्रवारीही मशिदीत नमाजदारांच्या प्रवेशामुळे वाहतुकीची कोंडी होत नाही. सुनेहरी मशिदीला महापालिकेने वारसा वास्तू म्हणून याआधीच अधिसूचित केले आहे.

SL/KA/SL

29 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *