मराठीला डावलणारी रेल्वेची वादग्रस्त जाहिरात रद्द
मुंबई, दि. २७ : रेल्वे आणि अन्य केंद्रीय आस्थापनांमध्ये मराठी माणसाला डावलण्याचे प्रकार अनेक वर्ष सुरू आहेत. विशेषत: रेल्वेच्या जाहिरांतीमध्ये क्लृप्त्या लढवत होतकरू मराठी तरूणांना फॉर्म भरण्यापासून वंचित ठेवले आहे. रेल्वेच्या या दुटप्पीपणाविरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार आवाज उठवला आहे. यामुळे मध्य रेल्वेला हिंदी भाषिकांना प्राधान्य देणारी आणि मराठीची गळचेपी करणारी जाहिरात आता रद्द केली आहे.
मध्य रेल्वेने 16 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध केलेली भरतीची अधिसूचना अखेर रद्द केली आहे. या अधिसूचनेत परीक्षेसाठी मराठी भाषेचा पर्याय डावलून केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेची सक्ती करण्यात आली होती. या अन्यायाविरोधात मनसे नेते अमित ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत रेल्वे प्रशासनाला जाब विचारला होता. जाहिरात रद्द झाली असली तरी, आता येणाऱ्या नवीन अधिसूचनेत मराठी भाषेचा समावेश असणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मध्य रेल्वेने वेगवेगळ्या पदांच्या भरतीसाठी 16 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत संगणक आधारित परीक्षेसाठी (CBT) मराठी भाषेचा समावेश नव्हता. रेल्वे बोर्डाने 23 मार्च 2026 रोजी परीक्षेचा पॅटर्न आणि अभ्यासक्रमाबाबत नवीन स्पष्टीकरण जारी केले आहे. जुनी जाहिरात ही जुन्या सूचनांवर आधारित असल्याने ती रद्द करून आता लवकरच नवीन अधिसूचना काढली जाणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
SL/ML/SL