वादग्रस्त पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण थांबवले, मसुरीला पाचारण

 वादग्रस्त पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण थांबवले, मसुरीला पाचारण

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेला आठवडाभराहून अधिक काळ प्रशासकीय व्यवस्थेला वेठीस धरणाऱ्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या कृत्याला आज अखेर लगाम बसला आहे. दृष्टीदोष, मानसिक आजारासह, बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून आयएएस झालेल्या वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर आता मोठा दणका बसलेला आहे. त्यांच्या प्रशिक्षणाला ब्रेक लावण्याचा निर्णय मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री अकादमीने घेतला आहे. महाराष्ट्रातील सुरू असलेले प्रशिक्षण सोडून २३ जुलैपूर्वी मसुरीत हजर राहण्याचे आदेश लाल बहादूर शास्त्री अकादमीने दिलेले आहेत. तुमच्यावरच्या आक्षेपांना उत्तरे देण्यासाठी मसुरीत यावे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळविण्याचा तेथील अधिकारी प्रयत्न करणार आहेत.युपीएससीच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यात चमकोगिरीमुळे चर्चेत आल्यानंतर आणि वादात अडकल्यानंतर पूजा खेडकर यांची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली होती. पुण्यात ऑडी कारवर अंबर दिवा लावल्याचा आणि वरिष्ठांचे केबिन बळकावल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्यानंतर ओबीसी सर्टिफिकिट, दिव्यांग सर्टिफिकीटच्या आधारे आरक्षणाच्या कोट्यातून युपीएससी परीक्षा दिल्यानं त्यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. अनेक आरोपांमुळे त्यांच्या चौकशीची मागणीही केली जात आहे.

पूजा खेडकरांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र वापरून परीक्षा उत्तीर्ण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे. तसेच त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असतानाही त्यांनी ओबीसी नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट काढले. या सर्व प्रकरणाची चौकशी केंद्र सरकार करणार आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाने पूजा खेडकर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एकसदस्यीय समिती नेमली आहे. या समितीने आपला तपास सुरू केला असून दोन आठवड्यात त्याचा अहवाल देखील देण्यात येणार आहे.

दरम्यान माजी सनदी अधिकारी असलेले पूजाचे वडील आणि आई यांच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र आपल्या बंगल्याला टाळे ठोकून खेडकर कुटुंब पसार झाले आहे. राजकीय लागेबंधे वापरून आपण व्यवस्था कशीही वाकवू शकतो या अति आत्मविश्वासातून त्यांनी घेतलेले निर्णय आता पूजाला चांगलेच भोवले आहेत. आता UPSC पूजावर आणखी काय कारवाई करते याकडे UPSC ची परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्याचे लक्ष लागून राहीला आहे. या तपासातून अनेकांचे पितळ उघडे पडणार असल्याच्या चर्चाही रंगत आहेत.

SL/ML/SL

16 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *