कुणाल कामरा हक्कभंग प्रकरणी महाधिवक्त्यांचा अभिप्राय मागवला

मुंबई, दि. १८ : विनोदी तिरकस वक्तव्य करत अनेक विषयांवर टिप्पणी करणाऱ्या कुणाल कामरा विरोधात महाराष्ट्र विधीमंडळाने दाखल केलेल्या हक्कभंग ठरावावर आता राज्याच्या महाधिवक्त्यांचा सल्ला मागण्यात आला आहे. कुणाल कामरा याने हक्कभंग नोटीसला दिलेल्या उत्तरानंतर त्याच्यावरील पुढील कारवाईसाठी हक्कभंग समितीने राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांना कायदेशीर सल्ला देण्याची विनंती केली आहे.
कुणाल कामराने हक्कभंग नोटीसला दिलेल्या उत्तरात म्हटले होते की, ही नोटीस जाणीवपूर्वक व चूकीच्या हेतूने देण्यात आलेली आहे. हक्कभंग समितीच्या बैठकीत कुणाल कामराचे हे उत्तर विचारात घेण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर पुढील कारवाई करण्याआधी किंवा त्याला पुन्हा नोटीस देण्याआधी कायदेशीर सल्ला मागण्याचा निर्णय घेण्यात आला.
कामराने म्हटले होते की, त्याच्या एकनाथ शिंदेंवरील टिप्पणीने विधीमंडळाच्या कामात अडथळा येत नसून त्याद्वारे इतर सदस्यांचा किंवा विधीमंडळाचाही अपमान होत नाही. आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाही उल्लेख त्याने या उत्तरात केला होता. जून महिन्यात विधानपरिषद अध्यक्षांनी कुणाल कामरा विरोधात हक्कभंग ठराव दाखल करुन घेत तो समितीकडे पाठवला होता. कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाणे की रिक्षा या उपहासात्मक गीताने टिप्पणी केली होती.
SL/ML/SL