सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन पवारांचा निर्णय मागे

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या तीव्र भावनांचा आदर करून मी मागे घेत आहे अशी घोषणा शरद पवार यांनी आज करत तीन दिवसांच्या नाट्यावर पडदा पाडला आहे.
आज सकाळी पक्षाच्या समितीची बैठक होऊन त्यात राजीनामा मागे घेण्याचा आग्रह करणारा ठराव संमत झाल्यावर या नेत्यांनी पवारांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांना पद न सोडण्याचा आग्रह केला. त्यानंतर सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन पवारांनी ही घोषणा केली.
यापुढे अधिक जोमाने काम करू, पक्षात उत्तराधिकारी निर्माण करणे गरजेचे आहे, पक्षात आता नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, मविआ आम्ही एकत्रित काम करू , मविआ वर या सगळ्याचा काहीही परिणाम होणार नाही असे पवारांनी वेगवेगळ्या प्रश्नांच्या उत्तरात स्पष्ट केले.
सुप्रिया सुळे या राष्ट्रीय अध्यक्ष होतील या बातमीत तथ्य नाही, राष्ट्रवादीचे काही नेते भाजपा मध्ये जात आहेत हेही खरे नाही , अजित पवार अजिबात नाराज नाहीत , त्यांनीच इतर नेत्यांसमावेत माझी आज भेट घेऊन राजीनामा न देण्याचा आग्रह केला असे शरद पवार यावेळी म्हणाले मात्र पक्षात होणाऱ्या एवढ्या मोठ्या घडामोडी नंतरच्या या पत्रकार परिषदेला अजित पवार उपस्थित नव्हते , ते दिल्लीत गेल्याची चर्चा आहे.
ML/KA/SL
5 May 2023