संकटांना संधी समजून संधीचे सोनं करा; नितीन गडकरींचा उद्योगपतींना सल्ला

मुंबई (एम एमसी न्यूज नेटवर्क) : “आयुष्यात संकटं येत असतात, पण ती संधी म्हणून पाहा आणि त्यातूनच यशाचं सोनं घडवा,” असा प्रेरणादायी सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उद्योगपतींना दिला. मुंबईत द डाईंग अँड पिगमेंट्स मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.
बांद्र्याच्या ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्ये पार पडलेल्या या भव्य समारंभात गुजरातचे वित्तमंत्री कानुभाई देसाई,असोसिएशनचे अध्यक्ष जनक मेहता, नामवंत उद्योगपती रज्जुभाई श्रॉफ, सुनील लालभाई, जितेंद्र पटेल, सी. के. सिंघानिया आणि शावक भुमगारा आदी मान्यवर उपस्थित होते. गडकरी म्हणाले, “भारताची अर्थव्यवस्था सध्या वेगाने विकसित होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आर्थिकदृष्ट्या सक्षम भारताचं स्वप्न साकार होत आहे. उद्योग, उद्योजकता आणि व्यापार हे देशाच्या विकासाचे आधारस्तंभ आहेत.”
ते पुढे म्हणाले की, “प्रदूषण रोखण्यासाठी आम्ही कचऱ्याचे पुनर्नवीनीकरण करून द्रुतगती महामार्गात वापर करत आहोत. तसेच, इंधन बचतीसाठी इथेनॉल व हायड्रोजनसारख्या पर्यायी इंधनांचा वापर वाढवण्यात येत आहे.” कार्यक्रमात डाईंग अँड पिगमेंट्स असोसिएशनच्या कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष जनक मेहता, माजी अध्यक्ष जितेंद्र पटेल, कमल कपूर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या इतिहास व कार्याचा आढावा दिला. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कापड उद्योगाला आवश्यक रंग आणि रसायन पुरवणाऱ्या या संघटनेने यंदा अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे.
मेहता यांनी सांगितले की, “चीननंतर भारत हा रंग व रंग मिश्रित रसायनांच्या पुरवठ्यात आघाडीवर आहे. या विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही माटुंगा येथील विद्यापीठाशी संलग्न अभ्यासक्रम सुरू केला आहे.” कार्यक्रमात यशस्वी उद्योजकांचा गौरव करण्यात आला आणि संघटनेच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
SW/ML/SL
12 April 2025