राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही गटाचे आमदार अपात्र नाहीत, सगळेच शाबूत

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही गटाचे आमदार अपात्र नाहीत, सगळेच शाबूत

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभेत खरी राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवारांचीच असल्याचा निर्वाळा देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवून अपात्रतेबाबतच्या याचिका निकाली काढल्या.

अजित पवार गटाने शरद पवारां विरोधात केलेली वक्तव्ये अथवा पक्षांतर्गत नाराजी ही पक्षविरोधी कारवाई ठरविता येणार नाही. दहाव्या परिशिष्टाचा वापर पक्षातील मतभेद दाबण्यासाठी करता येणार नसल्याचेही नार्वेकर यांनी आपल्या आजच्या निकालात स्पष्ट केले आहे. याच आधारावर दोन्ही गटाच्या आमदारांविरोधातील अपात्रतेची मागणी त्यांनी फेटाळून लावली आहे.

राष्ट्रवादी आमदार अपात्रता याचिकांवर निकाल देताना विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी विधिमंडळ पक्षात अजित पवारांकडे बहुमत असल्याचे स्पष्ट केले. अजित पवार गटच हा मूळ राष्ट्रवादी पार्टी आहे, कारण त्यांच्याकडे विधिमंडळात निर्विवाद बहुमत आहे असे आपल्या निकालात सांगितले. त्यामुळे विधिमंडळातील संख्याबळाच्या आधारावर मूळ पक्ष हा अजित पवार यांचा आहे. महाराष्ट्र विधानसभेतील ५३ पैकी ४१ आमदारांचा पाठिंबा त्यांना आहे आणि शरद पवार गटाने ते अमान्य केलेले नाही असेही नार्वेकर यांनी म्हटले आहे.

शरद पवार गटाने दाखल केलेल्या अपात्रता याचिकेत अजित पवार गटाच्या ४१ आमदारांच्या निलंबनाची मागणी केली होती. त्यावरूनही अजित पवार यांच्याकडे बहुमत असल्याचे लक्षात येते, असे नार्वेकरांनी निकाल वाचन करताना म्हटले. पक्षाची घटना आणि घटनेनुसार असलेली पक्षनेतृत्वाची रचना या निकषांवर राष्ट्रवादी कुणाची याचा निर्वाळा देता येणार नाही. त्यामुळे विधिमंडळातील बहुमताचा निकष वापरावा लागेल. त्यानुसार अजित पवार यांची खरी राष्ट्रवादी असल्याचे नार्वेकरांनी सांगितले.

२९ जून २०२३ पर्यंत शरद पवार यांच्या नेतृत्वाला कोणीही आव्हान दिले नव्हते. मात्र ३० जून रोजी त्यांच्या अध्यक्षपदाला आव्हान देऊन नव्या अध्यक्षाची निवड झाली. दोन्ही गटाच्या वतीने घटनेनुसार अध्यक्षपदाची निवड झाली नसल्याचा दावा करण्यात आला होता. आपला अध्यक्षच कसा योग्य आहे, हे पटवून देण्यासाठी दोन्ही गटाकडून समांतर पुरावे सादर करण्यात आले. परंतु पक्षाचा अध्यक्ष कोण हे ठरविण्याचे काम विधानसभा अध्यक्षांचे नसल्याचेही नार्वेकर यांनी निकालात स्पष्ट केले. पक्षांतर्गत मतभेदातून दोन गट तयार झाले होते. पक्षाच्या नेतृत्वाशी त्यांचे मतभेद होते. त्या मतभेदाच्या विरोधात अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी नाराजी नोंदवली होती. नेतृत्वाच्या निर्णया विरोधात किंवा भूमिके विरोधात नाराजी व्यक्त करणे म्हणजे पक्षात फूट पडली असे होत नाही, असेही राहुल नार्वेकरांनी आज आपल्या निकालात स्पष्ट केले आहे.

ML/KA/PGB
15 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *