विरोधी पक्षनेते पदासाठी केला अखेर काँग्रेसने दावा

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अजित पवार यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून राजीनामा देत थेट सत्तेत सहभागी होऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडली. हे पद रिक्त झाल्यावर तब्बल महिनाभराने आज काँग्रेसकडून त्यावर दावा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडल्यानंतर आणि त्यातील बहुमताने आमदार अजित पवार यांच्या गटात गेल्याने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेमके संख्याबळ किती ते अद्याप विधानसभेत स्पष्ट झालेले नाही. मात्र पडलेली फूट अद्याप कागदोपत्री सिद्ध झालेली नसतानाच आज काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांची त्या पदावर नियुक्ती करण्याचे पत्र अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आले आहे.
विधानसभा सभागृहात अजित पवार गट सत्ताधारी बाजूला बसत असून शरद पवार गट विरोधी बाकांवर बसतो मात्र ही कायमस्वरूपी बैठक नाही असे खुद्द अध्यक्षांनीच स्पष्ट केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच असा दावा दोन्ही बाजूने करण्यात आला असून तो निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष या दोघांकडे अद्याप प्रलंबित आहे.
या फुटीनंतर काँग्रेसची संख्या जास्त असली आणि शरद पवार गटाने जितेंद्र आव्हाड यांच्या रूपाने केलेल्या दाव्यावर तसेच राष्ट्रवादी बाबत निकाल लागत नाही तोवर विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय अध्यक्ष घेतील का असा प्रश्न आहे.
ML/KA/SL
1 Aug 2023