पुलवामा हल्ला प्रकरणाची जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी (JPC) द्वारे चौकशीची काँग्रेसची मागणी
मुंबई दि.18( एम एमसी न्यूज नेटवर्क): जम्मू – काश्मीरमध्ये २०१९ साली घडलेल्या पुलवामा हल्ला प्रकरणासाठी केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असून या प्रकरणी तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल संशयाच्या भोवऱ्यात असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी (JPC) द्वारे करण्यात यावी व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस चे मुंबई अध्यक्ष- भाई जगताप यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे भारतीय सैनिकांवर हल्ला झाला. ज्यामध्ये आपल्या देशाचे ४० लष्करी जवान शहीद झाले होते. पुलवामा हल्ल्यात वापरले गेलेले ३०० किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आले होते हे खरे, पण ही स्फोटके घेऊन जाणारी मोटार १०- १५ दिवस जम्मू -काश्मिरच्या रस्त्यांवर आणि गावामध्ये फिरत होती. त्याचा सुगावाही गुप्तहेर यंत्रणांना लागला नाही, हे मोठे अपयश म्हणावे लागेल, असे धक्कादायक विधान जम्मू काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिलेल्या मुलाखतीत केले होते.
तसेच ‘सीआरपीएफ’ आणि केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अकार्यक्षमता व बेफिकिरीचा परिणाम होता. ‘सीआरपीएफ’च्या ताफ्याच्या वाहतूकीसाठी फक्त पाच विमानांची गरज होती, पण तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अखत्यारीतील गृहमंत्रालयाने त्याला नकार दिला. त्यामुळे नाइलाजाने हा ताफा रस्त्यावरून नेला गेला. खरे तर जवानांचा ताफा जाण्यापूर्वी संपूर्ण मार्ग निर्धोक असल्याची खात्री नेहमीच केली जाते, पण त्यातही कुचराई केली गेली. एवढा मोठा ताफा भूमार्गाने जाणारच असेल जर त्यास मिळणा-या सर्व अन्य मार्गाचीही नाकेबंदी करावी लागते. बॉम्ब स्क्वाड पथक पाहणी करतात, पण तसे न करताच हा ताफा निघाला होता, अशी माहिती देखील सत्यपाल मलिक यांनी दिली. तसेच ज्या वेळेस हा हल्ला झाला त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये शूटिंग करत होते. त्यांचे शूटिंग संपल्यावर त्यांना या हल्ल्याची संपूर्ण माहिती सत्यपाल मलिक यांनी दिली असता, पंतप्रधान मोदींनी त्यांना गप्प राहण्याचे फर्मान सुनावले तसेच अजित डोभाल यांनी सुद्धा गप्प राहण्यास सांगितले होते.
नरेन्द्र मोदी यांनी पाकिस्तानवर दोषारोप करून भाजप सरकारला २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत लोकांची सहानभूती आणि फायदा मिळवण्याचा हेतू स्पष्ट होत आहे. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या संपूर्ण माहितीवरून जम्मू – काश्मीरमध्ये २०१९ साली घडलेल्या पुलवामा हल्ला प्रकरणासाठी केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची व तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी मार्फ़त (J P C) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली.
या पत्रकार परिषदेमध्ये भाई जगताप यांच्या सोबत AICC सचिव आशिष दुआ, निवृत्त लेफ्टनंट कर्नल व माजी सैनिक कल्याण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत रानडे, मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष भूषण पाटील, सिव्हिक सोसायटीचे फिरोझ मिठीबोरवाला, मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते, सरचिटणीस संदेश कोंडविलकर व सहकोषाध्यक्ष अतुल बर्वे उपस्थित होते.
यावेळेस बोलताना निवृत्त लेफ्टनंट कर्नल चंद्रकांत रानडे म्हणाले की, या हल्ल्या आधी असा हल्ला होण्याची शक्यता आहे, अशी माहिती इंटेलिजन्स खात्याकडून मिळाली होती. पण माहिती घेऊन सुद्धा पुरेशी दक्षता घेतली गेली नाही. तसेच ही RDX ने भरलेली गाडी कुठून आली, याची देखील चौकशी झाली नाही. देशामध्ये साधी गोळी झाडली गेली असेल किंवा एखाद्या ठिकाणी स्फोट झाला असेल त्याची चौकशी होते. मग ३०० किलो RDX चा स्फोट घडवून आणणाऱ्या गाडीची चौकशी करण्यात आली नाही. ज्या मार्गाने सैनिकांचा ताफा जाणार होता, त्याचे योग्य तर्हेने सॅनिटायझेशन (सर्व चेकिंग) झाले नाही. जर असे झाले असते, तर अशी घटना घडलीच नसती. यातूनच सुरक्षा यंत्रणेचा गलथानपणा समोर येतो.
पुलवामा प्रकरणा संदर्भात सरकारने संपूर्ण अहवाल सादर करणे बंधनकारक होते परंतु भाजप सरकारने असा कोणताही अहवाल सादर देखील केला नाही. हे सर्व प्रकरण अत्यंत गंभीर व संशयास्पद आहे. त्यामुळे भाई जगताप यांनी या प्रकरणाची चौकशी JPC मार्फत करण्याची मागणी केली आहेच, पण या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेल्या समितीमार्फत सुद्धा करण्यात यावी. अशी आमची मागणी आहे. तसेच पुलवामा हल्ला प्रकरणी कारवाई साठी जनहित याचिका (PIL) दाखल करणार आहोत. कारण हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.
SW/KA/SL
18 April 2023