काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक रखडली , नेताच ठरेना
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा निवडणुकीच्या निकालाला 16 दिवस होऊन देखील अद्याप काँग्रेस विधानमंडळ पक्षाची बैठकच झालेली नाही. ती नेमकी कधी होईल यासंदर्भात अद्यापही अनिश्चितता असून दिल्लीतून या संदर्भात कोणत्याही सूचना न आल्याने ही बैठक केव्हा घ्यायची यासंदर्भात कोणतीही स्पष्टता नाही. विधिमंडळाच्या नेतेपदी कोणाची निवड करावी यासंदर्भात काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजीला उत आला असून त्यामुळेच ही बैठक रखडली असल्याची चर्चा आहे.
23 तारखेला राज्य विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागला, त्यात काँग्रेसला अवघ्या 16 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. काँग्रेसची स्थिती इतकी दयनीय का झाली या संदर्भात देखील अद्याप कोणतीही बैठक अथवा चिंतन झालेले नाही. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांना म्हणजेच पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांना भेटून आले. त्यांनी अद्याप तरी पटोले यांना अभय दिलेले आहे. मधल्या काळामध्ये पटोले यांच्या राजीनाम्याची चर्चा होती मात्र खुद्द पटोले यांनीच त्याचा इन्कार केला आहे .
आता पटोले हे विधिमंडळ पक्षाचा नेता होण्यास इच्छुक असून विजय वडेट्टीवार यांना देखील या नेतेपदामध्ये रस आहे. मात्र दोघेही ओबीसी नेते असून दोघांपैकी एकच विधिमंडळ पक्षाचा नेता होऊ शकतो आणि विधानसभेचा नेता मात्र अन्य समाजाचा व्यक्ती होईल. त्यामुळे सध्या विरोधी पक्षनेते असलेले विजय वडेट्टीवार जर विधिमंडळ पक्षाचे नेते झाले नाहीत तर त्यांना कोणतेच पद मिळणार नाही त्यामुळे त्यांचा किमान विधानसभेचा गटनेता होण्याचा प्रयत्न आहे. असे झाल्यास नाना पटोले यांना विधिमंडळाचा नेता होणे शक्य होणार नाही यामुळे नेमका नेता कोणता असावा हे अद्याप निश्चित होत नाही आणि त्यामुळेच विधिमंडळ पक्षाची बैठक रखडली असल्याची चर्चा आहे .
नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार करायचे झाल्यास त्या ठिकाणी नवीन अध्यक्ष नेमण्यासाठी तरुण रक्त असावे असाही एक मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे . त्या जागेसाठी सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. त्यासोबतच निवडणुकीत पराभूत झालेले वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याही नावाची चर्चा आहे. विधानसभेत गटनेते पदासाठी विश्वजीत कदम यांच्या देखील नावाची चर्चा आहे. या सगळ्या घोळामध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक रखडली असून ती नेमकी कधी होईल याबाबत कोणतीही स्पष्टता दिल्लीतील नेत्यांनी दिलेली नाही.
विधानसभेचे विशेष अधिवेशन तीन दिवस मुंबईत सुरू आहे आणि येत्या 16 तारखेपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन अपेक्षित आहे , यातच विधिमंडळ पक्षाचा नेता अद्याप न ठरल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे.
ML/ML/PGB
8 Dec 2024