काँग्रेसचे नतिकोद्दीन खतीब यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेसच्या सॉफ्ट-हिंदुत्वावर नाराज असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खतीब सैय्यद नतीकोद्दीन यांचा इतर 9 मुस्लिम नेत्यांसह वंचित बहुजन आघाडी मध्ये सामील झाले आहेत. मुस्लिम प्रतिनिधीत्व मुद्द्यावर समझोता करू शकत नाही असे खतीब यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या उपस्थितीत झालेल्या मुंबई येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
लोकसभेच्या काळात मुस्लिमांना उमेदवारी देणे कठीण आहे. मात्र, येणाऱ्या विधानसभेत मुस्लिमांना आम्ही उमेदवारी देऊ असे काँग्रेसने म्हटले होते. विधान परिषदेत सुद्धा मुस्लिमांना न्याय मिळाला नाही. आमच्या मतांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडी जिंकून येते आणि जेव्हा आम्हाला सत्तेत वाटा पाहिजे असतो तेव्हा मुस्लिमांचा बळी दिला जातो, असे खतीब यांनी म्हटले आहे.
खतीब म्हणाले की, मुस्लिमांना त्यांचे हक्क अधिकार मिळतील या हेतूने मी काँग्रेसमध्ये अनेक वर्षे काम केले. पण आम्ही 2024 मध्ये जेव्हा लोकसभा निवडणुका झाल्या तेव्हा पाहिले की, काँग्रेसने एकाही मुस्लीम व्यक्तीला लोकसभेची उमेदवारी दिली नाही. लोकसभेच्या काळात संविधान वाचवण्याचा मुद्दा होता. तेव्हा देशातील सर्व अल्पसंख्याकांनी काँग्रेसला साथ दिली. एवढे होऊन सुद्धा काँग्रेस आम्हाला सहभागी करून घेत नाही. बाळासाहेब आंबेडकर हे अकोल्यातून दोनदा खासदार झाले आहेत. त्यांनी नेहमीच अकोल्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुस्लिमांना प्रतिनिधित्व दिले. अकोल्यातील महिला व बालविकास सभापती मुस्लीम आहे. अनेक पदाधिकारी अल्पसंख्यांक समुदायातील आहेत. या वीस वर्षांत पंचायत समितीमध्ये सुद्धा बाळासाहेबांनी मुस्लीम सभापती बसवल्याची आठवण सुद्धा खतीब यांनी या वेळी करून दिली.
खतीब कुटुंबीय मागील सात दशकांपासून काँग्रेसमध्ये आहे. मागील लोकसभेत काँग्रेसने मुस्लिमांना प्रतिनिधित्व नाकारल्याने आणि काँग्रेसच्या सॉफ्ट हिंदुत्वावर नाराजी व्यक्त करत त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश आहे केला आहे, असेही त्यांनी सांगितले.
या वेळी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, राज्य उपाध्यक्ष फारूक अहमद, इम्तियाज नदाफ आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते
SW/ML/PGB
9 Oct 2024