नागपूर अधिवेशनाच्या तारखेवरून घोळ , संभ्रम कायम

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधिमंडळाच्या नागपूर इथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या तारखेवरून सध्या मोठा घोळ सुरू असून त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि पत्रकार यांच्यात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
मुंबईत संपलेल्या पावसाळी अधिवेशनात हिवाळी अधिवेशनाची नियोजित तारीख सात डिसेंबर अशी जाहीर करण्यात आली होती. ही तारीख राज्यपालांच्या कडून आलेल्या पत्रात नमूद केलेली होती त्यामुळे त्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जाहीर केली होती.
आता मात्र आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी अध्यक्षांकडे सुरू आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ डिसेंबर पर्यंत ती पूर्ण करून त्यावर निकाल द्यायचा आहे. त्यामुळे गेले काही दिवस ही सुनावणी जवळपास रोज सुरू आहे. काल झालेल्या सुनावणीत अध्यक्षांनी दोन्ही बाजूच्या वकिलांना सुनावणी तारखा जाहीर केल्या त्यात अकरा तारखेला अधिवेशन घ्यायचे ठरल्यास सात तारखेपर्यंत मुंबईत सुनावणी घेऊ असे सांगितले.
यामुळेच अधिवेशनाची नेमकी तारीख काय असा गोंधळ आहे. या अधिवेशनासाठी मंत्रालय आणि विधिमंडळ कार्यालयाचे जवळपास दोन हजार कर्मचारी, सुमारे दोनशे पत्रकार, अडीच ते तीन हजार राज्यभरातील विविध खाती, महामंडळे , कार्यालये यांचे कर्मचारी आणि सुमारे सात हजार पोलिस अधिकारी, कर्मचारी असा बारा ते तेरा हजार जणांची तात्पुरती व्यवस्था नागपुरात असते . त्यांची जाण्या येण्याच्या तिकिटांचे आरक्षण, राहण्याची व्यवस्था आदीची तयारी बऱ्याच आधीपासून करण्यात येते. त्यामुळे तारखेतला बदल या सगळ्यांवर विपरीत परिणाम करतो.
अध्यक्षांनी सुनावणीत तारखांबाबत वेगळे वक्तव्य केल्याने अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला असून येत्या २९ तारखेला होणाऱ्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत यावर काय निर्णय होईल , राज्यपालांनी दिलेली तारीख बदलता येईल का याची चर्चा सध्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.
ML/KA/SL
24 Nov. 2023