राज्यात प्रकल्पग्रस्तांच्या जमीन वाटपात घोळ, उच्च स्तरीय समिती स्थापन

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील अनेक प्रकल्पांसाठी अधिग्रहित जमिनींचे पुनर्वसनात नव्याने जमीन वाटप करताना झालेला घोळ शोधण्यासाठी एका उच्च स्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असून त्यातील अहवालानुसार आवश्यकता भासल्यास चुकीच्या पद्धतीने वाटप झालेल्या जमिनी परत घेतल्या जातील अशी माहिती मदत आणि पुनर्वसन खात्याचे मंत्री अनिल पाटील यांनी सभागृहात दिली.
याबाबतचा प्रश्न समाधान अवताडे यांनी उपस्थित केला होता. त्यावर संग्राम थोपटे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील, दिलीप मोहिते पाटील आदींनी उप प्रश्न विचारले. पुनर्वसन योजना लागू करताना अनेक ठिकाणी चुकीचे वाटप , दोनदा वाटप , अतिरिक्त वाटप झाल्याच्या तक्रारी आहेत त्यावर ही समिती अभ्यास करेल असं मंत्री म्हणाले.
फ्लेमिंगो चा अधिवास सुरक्षित करण्याचे प्रयत्न
नवी मुंबई येथील डी पी एस तलाव परिसरात फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्षाचा अधिवास वाढून तो संरक्षित व्हावा यासाठी प्रधान सचिव, वने यांची उच्च स्तरीय समिती नेमण्यात आली असून ती येत्या दोन महिन्यांत त्याचा अहवाल सादर करेल अशी माहिती वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या समितीत कांदळवन संरक्षक , बी एन एच एस चे अधिकारी आदींचा समावेश आहे. या परिसरातील प्रखर एल ई डी लाईट येत्या महिनाभरात बदलले जातील असं ही मंत्री म्हणाले.
या भागात झालेल्या फ्लेमिंगो पक्षांच्या मृत्यूबाबतचा प्रश्न चेतन तुपे यांनी विचारला होता, त्यावर आशिष शेलार, जयंत पाटील, संजय केळकर आदींनी उप प्रश्न विचारले.कांदळवनांचा नाश करणाऱ्या लोकांवर दंड आणि शिक्षा असे दोन्ही होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं ही मुनगंटीवार यांनी सांगितलं.
पीक विमा योजना अधिक प्रभावी करण्यासाठी…
पीक विमा योजना अधिक प्रभावी करण्यासाठी राज्यातील दहा हजार गावे गाव निहाय हवामान केंद्र करून जोडली जातील अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. केळीच्या विम्याबाबत चा प्रश्न संजय सावकारे यांनी उपस्थित केला होता. पीक विमा नाकारताना तो कारणासह नाकरावा लागतो , उपग्रहाचे फोटो काढून द्यावे लागतात असं मंत्री म्हणाले. कोकणातील आंबा पिकावर ढगाळ वातावरणामुळे होणारा परिणाम ही विमा कंपनीने विचारात घ्यावा अशा सूचना दिल्या जातील असं मुंडे यांनी सांगितलं. त्यावर राजेश टोपे , पृथ्वीराज चव्हाण, भास्कर जाधव यांनी उप प्रश्न विचारले.
SL/ML/SL
5 July 2024