राष्ट्रवादी मध्ये संघर्ष उफाळला, तटकरे झाले प्रदेशाध्यक्ष

 राष्ट्रवादी मध्ये संघर्ष उफाळला, तटकरे झाले प्रदेशाध्यक्ष

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडल्याचे आता स्पष्ट झाले असून एकीकडे प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांना काढून टाकल्याचे शरद पवार यांनी जाहीर केल्यावर लगेच प्रफुल्ल पटेल यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दूर करीत त्याजागी सुनील तटकरे यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काल झालेल्या मोठ्या राजकीय भूकंपानंतर शरद पवार हे पक्ष बांधणीसाठी नव्याने आज बाहेर पडले तर दुसरीकडे अजित पवार गटानेही आपली ताकद दाखवत बहुतांश पक्ष आपल्या सोबत असल्याचे म्हटले आहे. शरद पवार गटाने अजित पवार गटात जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याचे सत्र सुरू केले असून त्याजागी नव्या नियुक्त्या करीत असल्याचे जाहीर केले आहे, प्रसारमाध्यमात अशा नव्या नियुक्त्या जाहीर केल्या जात असून त्या मुंबई आणि राज्यभरात आहेत.

काल शरद पवार यांनी आपण कोर्टात जाणार नाही तर जनतेच्या समोर जाऊ असे सांगत एका बाजूला साताऱ्यात दौरा करीत कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधला तर दुसरीकडे मंत्री पदाची शपथ घेणाऱ्या नऊ जणांवर अपत्रतेची कारवाई करण्याची मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे काल रात्रीच केली. अजित पवार यांच्या जागी जितेंद्र आव्हाड यांना नेमले तर प्रतोद पदी ही त्यांचीच नियुक्ती केली. लगेचच आज काही पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली त्यात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचाही समावेश आहे.

दुसरीकडे अजित पवार गटाने पत्रकार परिषद घेऊन प्रदेशाध्यक्ष पदी जयंत पाटील यांना दूर करून सुनील तटकरे यांना कालच नेमल्याचे जाहीर केले, हे आपण राष्ट्रीय कार्याध्यक्ष या नात्याने केल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी सांगितले. अजित पवार यांना विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून तर अनिल पाटील यांना प्रतोद पदी नेमल्याचे पत्र कालच विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे दिल्याचे ही ते म्हणाले. तर आम्हाला काढून टाकण्याचा अधिकार कोणालाही नाही विरोधी पक्षनेता आणि बाकी नियुक्त्या विधानसभेचे अध्यक्ष संख्याबळ पाहून करतात असे अजित पवार म्हणाले. आमच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे म्हणूनच आम्ही मंत्री झालो असेही ते म्हणाले.

शरद पवारांच्या गटाने फुटून निघालेल्या आमदारांना चुचकरण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही असे जयंत पाटील यांनी सांगितले, येत्या पाच तारखेला पक्षाची बैठक बोलावली आहे असेही ते म्हणाले. दुसरीकडे अजित पवार गटाने ही पक्ष बैठक याच दिवशी बोलावली आहे. या गटाने महिला प्रदेशाध्यक्ष पदी रुपाली चाकणकर यांची , युवक अध्यक्ष पदी सूरज चव्हाण यांची तर प्रवक्ते म्हणून अमोल मिटकरी, उमेश पाटील आणि आनंद परांजपे यांची नेमणूक केली असल्याचे सुनिल तटकरे यांनी जाहीर केले आहे.

ML/KA/SL

3 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *