मुकेश चौक ते प्रियदर्शिनी पार्क दरम्यान रस्ते काँक्रिटीकरण
मुंबई प्रतिनिधी,दि. १४ : बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत, मुकेश चौक ते प्रियदर्शिनी पार्क दरम्यान नेपियन सी रस्ता या महत्त्वपूर्ण मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ७७० मीटर लांब व २७.४५ मीटर रुंद रस्ता विकसित करण्यात येणार आहे. यासाठी वाहतूक पोलिसांकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ प्राप्त झाले आहे. काँक्रिटीकरण कामाच्या कालावधीत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तात्पुरते वाहतूक बदल, अंशतः रस्ता बंद तसेच पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात येणार आहे. पावसाळ्यापूर्वी पहिल्या टप्प्याचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या कालावधीत नागरिकांनी व स्थानिक रहिवाशांनी प्रशासनास आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
मुंबईच्या पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी महत्त्वाकांक्षी रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्प राबविण्यात येत आहे. टप्पा १ आणि टप्पा २ अंतर्गत शहर आणि उपनगर भागात काँक्रिटीकरण कामे सुरु आहेत. काँक्रिटीकरण टप्पा १ अंतर्गत निर्धारित उद्दिष्टांपैकी ७७ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. तर टप्पा २ अंतर्गत ५२ टक्के कामे पूर्णत्वास गेली आहेत. एकूण मिळून ६३ टक्के कामे यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहेत.
यापुढील कालावधीत काँक्रिटीकरण कामे करताना रस्तेनिहाय सूक्ष्म नियोजन करावे. हाती घेतलेला रस्ता निश्चित केलेल्या कालमर्यादेत पूर्ण करावा, असे स्पष्ट निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
काँक्रिटीकरण टप्पा १ अंतर्गत शहर विभागातील नेपियन सी रस्ता या महत्त्वपूर्ण मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण हाती घेण्यात आले आहे. उपप्रमुख अभियंता (रस्ते) शहर कार्यालयाने या कामी सूक्ष्म नियोजन केले आहे. या रस्त्याची एकूण लांबी १९५० मीटर आहे. त्यात पुलाचा २०० मीटर भाग समाविष्ट आहे. त्यापैकी १,७५० मीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण नियोजित आहे. पहिल्या टप्प्यात मुकेश चौक ते प्रियदर्शिनी पार्क दरम्यान ७७० मीटर लांब व २७.४५ मीटर रुंद रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. मंगळवार, दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ पासून या कामास सुरुवात होणार आहे. पावसाळ्यापूर्वी काँक्रिटीकरण कार्यवाहीचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
डी विभागाचे सहायक आयुक्त श्री. मनीष वळंजू यांनी अलीकडेच या रस्ते कामाचा आढावा घेतला. स्थानिक नगरसेवक श्री. अजय पाटील, श्री. सनी सानप, श्रीमती स्नेहल तेंडुलकर, श्री. गौरंग झवेरी यांच्यासह उपप्रमुख अभियंता (रस्ते) (शहर) डॉ. विशाल ठोंबरे, सहायक अभियंता श्री. हुलावळे, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नीलेश कांबळे आदी या बैठकीस उपस्थित होते.
रस्ते काँक्रिटीकरण कालावधीत नागरिकांना तात्पुरते वाहतूक बदल, अंशतः रस्ता बंद तसेच पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात येणार आहे. नागरिकांची गैरसोय कमी व्हावी यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या कालावधीत महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे. कामाच्या ठिकाणी दिलेल्या वाहतूक व सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.