संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप – लोकसभेत १२ तर राज्यसभेत १४ विधेयके मंजूर

नवी दिल्ली, दि. २१ : २१ जुलैपासून सुरू झालेल्या संसदेतल्या पावसाळी अधिवेशनाचा आज समारोप झाला. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृह अनिश्चित काळासाठी तहकूब करत अधिवेशन संपल्याची घोषणा केली. या महिनाभर चाललेल्या अधिवेशनात लोकसभेत १२ तर राज्यसभेत १५ विधेयकांना मंजुरी मिळाली.
अधिवेशनात एकूण १२० तासांच्या चर्चेची वेळ निश्चित करण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात केवळ ३७ तासांची चर्चा होऊ शकली. वारंवार गोंधळ, तहकूब आणि विरोधकांच्या बहिष्कारामुळे कामकाजात अडथळे निर्माण झाले. विरोधी पक्षांनी बिहार SIR प्रकरणावर चर्चेची मागणी करत सतत गोंधळ घातला, ज्यामुळे शेवटच्या दिवशीही सभागृहात कामकाज सुरळीत होऊ शकले नाही.
या अधिवेशनात मंजूर झालेल्या महत्त्वाच्या विधेयकांमध्ये ऑनलाईन मनी गेमिंगवर बंदी घालणारे विधेयक, ऑपरेशन सिंदूरवरील चर्चा, आणि काही आर्थिक व सामाजिक सुधारणा करणारी विधेयके यांचा समावेश होता. लोकसभेत फक्त ५५ प्रश्नांची उत्तरे देण्यात आली, तर एकूण ४१९ प्रश्न विचारण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात उपस्थिती दर्शवली. राष्ट्रगीताच्या सुरांनी अधिवेशनाचा समारोप झाला आणि दोन्ही सभागृह अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले.
या अधिवेशनात कामकाजाच्या मर्यादित वेळेमुळे अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चेअभावी प्रलंबित राहिले. मात्र, मंजूर झालेली विधेयके देशाच्या धोरणात्मक दिशेला आकार देणारी ठरतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.