ज्येष्ठांसाठी गृहनिर्माण योजना साकारणाऱ्या बिल्डर्सना चटईक्षेत्रफळात सवलती

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र शासनाने सेवानिवृत्त आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण जाहीर केले आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र गृहनिर्माण स्थावर संपदा प्राधिकरणाने (महारेरा) आदर्श मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आता राज्य शासनाने याबाबत पुढाकार घेत ज्येष्ठ नागरिकांसाठी धोरणाचा मसुदा जारी केला आहे. ज्येष्ठांसाठी गृहनिर्माण योजना राबविणाऱ्या विकासकांना चटईक्षेत्रफळात सवलती देऊ केल्या आहेत. आता विकासकांना ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र वा मिश्र स्वरूपात गृहनिर्माण प्रकल्प राबविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी विकासकांना शासनाने सवलतीही देऊ केल्या आहेत.
महत्त्वाच्या तरतूदी
- ज्येष्ठांसाठीच्या गृहनिर्माण प्रकल्पात अडीच इतके चटईक्षेत्रफळ हे पायाभूत चटईक्षेत्रफळ म्हणून गणले जाणार आहे. हरित पट्ट्यातही ज्येष्ठांसाठी गृहनिर्माण प्रकल्प उभारल्यास एक इतके चटईक्षेत्रफळ उपलब्ध होणार आहे.
- चटईक्षेत्रफळाच्या दहा टक्के चटईक्षेत्रफळाचा व्यापारी वापर करता येणार आहे वा वापरता न येणाऱ्या चटईक्षेत्रफळाच्या मोबदल्यात विकास हक्क हस्तांतर (टीडीआर) मिळणार आहे.
- विकास शुल्कात सवलत तसेच वस्तू व सेवा कर फक्त एक टक्का असेल. स्वतंत्र इमारत म्हणून ज्येष्ठांसाठी प्रकल्प राबविता येण्यासाठी तीन हजार चौरस मीटरचा भूखंड आवश्यक असून त्यापैकी ३५ टक्के भूखंडाचा त्यासाठी वापर आवश्यक असल्याची सुधारणा राज्यासाठी असलेल्या एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीत करण्यात येणार आहे.
SL/ML/SL
3 Sept 2024