“बगळ्यांची माळ फुले” – कविवर्य वा.रा. कांत यांच्या साहित्यावर आधारित बहारदार मैफिल
मुंबई दि २५ : सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आयोजित “बगळ्यांची माळ फुले” ही साहित्य, कविता आणि संगीताने नटलेली विशेष मैफिल २८ ऑक्टोबर २०२५ रोजी दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे सायंकाळी ६.३० वाजता रंगणार आहे. कार्यक्रमाचे संयोजन कलाविष्कार या संस्थेतर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे जेष्ठ कवी, लेखक आणि विचारवंत वा.रा. कांत यांच्या समृद्ध साहित्यविश्वाचा सन्मानपूर्वक आढावा घेण्यात येणार असून, त्यांच्या कवितांतील आणि लेखनातील भावविश्व सादरीकरणाच्या विविध माध्यमांतून प्रकट होणार आहे.
या मैफिलीमध्ये प्रख्यात कलाकार संजय मोने आणि ऐश्वर्या नारकर तसेच वा. रा. कांत यांचे चिरंजीव मुकुंद कांत यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले आहे. त्यांच्या अभिवाचनासोबतच श्रीरंग भावे, अनिरुद्ध जोशी आणि मृण्मयी फाटक हे गायक वा.रा. कांत यांची प्रसिद्ध गाणी सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध निवेदिका धनश्री दामले करतील, तर संहिता लेखन केलं आहे अनुया गरवारे–धारप यांनी. या कार्यक्रमासाठी वा. रा. कांत यांच्या गाण्यांवर आणि साहित्यावर आधारित काही खास ध्वनिचित्रफिती मंगेश मुळजकर यांनी तयार केल्या आहेत. “बगळ्यांची माळ फुले” ही मैफिल केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नसून, मराठी साहित्यातील एका समृद्ध परंपरेला आणि कवी वा.रा. कांत यांच्या गहन संवेदनशीलतेला वाहिलेली एक सुंदर कलांजली ठरणार आहे.
महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत अशा उपक्रमांद्वारे राज्यातील साहित्य, संगीत आणि रंगभूमी क्षेत्रातील श्रेष्ठ परंपरा जनमानसात रुजविण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न होत आहे, यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून, रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठी साहित्य आणि संगीताचा हा बहारदार सोहळा अनुभवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक ९९३०११५७५९ देण्यात आला आहे.
ML/ML/SL