शिवमहापुराण कथेच्या आयोजनाच्या निमित्ताने जंगलात मानवी हस्तक्षेप वाढण्याची चिंता

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एकीकडे पोहरा-मालखेड अभयारण्याचा प्रस्ताव अडगळीत पडलेला असताना छत्रीतलाव ते भानखेड मार्गावर हनुमान गढी येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवमहापुराण कथेच्या आयोजनाच्या निमित्ताने जंगलात मानवी हस्तक्षेप वाढण्याची चिंता वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाआधी परिसरातील वृक्ष विनापरवानगी कापून त्याची विल्हेवाट लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या नेतृत्वात हनुमान चालिसा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कथा प्रवक्ते पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन येत्या १५ ते २० डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे. छत्रीतलाव ते भानखेड मार्गावर सुमारे ५० एकर क्षेत्रात मोठा मंडप उभारण्यात येत आहे. याच ठिकाणी बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांच्या निवासाची आणि भोजनाची देखील व्यवस्था राहणार आहे.
या कार्यक्रमाच्या आयोजनाआधी झालेल्या वृक्षतोडीची तक्रार ‘वाईल्डलाईफ अवेअरनेस रिसर्च अॅन्ड रेस्क्यू वेलफेअर सोसायटी (वॉर) या संस्थेने विभागीय आयुक्तांकडे केली. छत्री तलाव, भानखेड रोड, माळेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती आणि वृक्ष आहेत. या परिसरातील जंगल हे वन्यजीवांचा अधिवास आहे. काही लोकांनी या परिसरातील वृक्ष कापून त्यांची वाहतूक करून विल्हेवाट लावली. त्यामुळे वन्यप्राणी शहराकडे धाव घेत असून अचानक मानवी वर्दळ आणि हस्तक्षेप वाढल्याने मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्याचा धोका असल्याचे या संस्थेने निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम, भारतीय वन अधिनियम, महाराष्ट्र वृक्ष संवर्धन अधिनियमातील कलमांन्वये बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ‘वॉर’ संस्थेने विभागीय आयुक्तांकडे केली. अशीच मागणी भीम ब्रिगेड या संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
“शिवमहापुराण कथेच्या आयोजनाला विरोध असण्याचे कारण नाही, पण या निमित्ताने जंगलात मानवी हस्तक्षेप वाढू नये, याची काळजी घेतली पाहिजे. कार्यक्रमाआधी काही लोकांनी वृक्षतोड केली, त्यांच्यावर कारवाई अपेक्षित आहे.” – नीलेश कांचनपुरे, अध्यक्ष, ‘वॉर’ संस्था.
Concerns over human encroachment in forests due to staging of Shiva Mahapuran story
ML/KA/PGB
15 Dec 2023