रस्त्यावर काँक्रिट ओतण्याची कामे २० मे २०२५ पर्यंत पूर्ण करा

मुंबई, दि-7
रस्ते काँक्रिटीकरण कामांचा अखेरचा टप्पा सुरू झाला असून काँक्रिट ओतण्याची कामे (PQC) दिनांक २० मे २०२५ पर्यंत पूर्ण करावीत. जेणेकरून दिनांक ५ जून २०२५ पर्यंत रस्त्यांचे क्यूरिंग आणि अंतिम कामे (फिनिशिंग) पूर्ण करता येतील. दिनांक ५ जून २०२५ नंतर महानगरपालिकेच्या रस्ते व वाहतूक विभागाचे एकही रस्तारोधक (Barricades) रस्त्यावर दिसता कामा नये. नागरिकांना सुरक्षित, खड्डेविरहित आणि वाहतूकयोग्य रस्त्यांची अनुभूती मिळावी, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. यासाठी आवश्यक ती यंत्रणा व मनुष्यबळ तत्काळ कार्यान्वित करून रस्ते कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे निर्देशदेखील श्री. बांगर यांनी दिले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सिमेंट काँक्रिट रस्ते प्रकल्पाची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे. दिनांक ३१ मे २०२५ पूर्वी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्णत्वास जावे, यासाठी सूक्ष्म नियोजन (Micro Planning) करण्यात आले आहे. या रस्ते विकास कामांचा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी आज (दिनांक ६ मे २०२५) महानगरपालिका मुख्यालयात विभाग (वॉर्ड) निहाय आढावा घेतला. तसेच, संबंधितांना आवश्यक ते निर्देश दिले. प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक विभाग) श्री. गिरीश निकम, उपप्रमुख अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्यासह २४ विभागांचे सहायक अभियंता बैठकीस उपस्थित होते.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर म्हणाले की, प्रत्येक रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी निश्चित तारीख ठरविण्यात आली आहे. दिनांक ३१ मे २०२५ नंतर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकाही रस्त्याचे काँक्रिट काम सुरू राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. चौक ते चौक (Junction To Junction) रस्ते काम पूर्ण करण्यावर भर द्यावा. रस्ते खोदकामास यापूर्वीच मनाई करण्यात आली आहे. एकूणच, पावसाळ्यात रस्ते वाहतूक सुरळीत सुरू राहिल, या दृष्टीने नियोजन करावे. दिनांक ३१ मे २०२५ पर्यंत पेव्हमेंट क्वालिटी काँक्रिट (PQC) ची कामे सुरू राहिली तर त्यानंतर क्यूरिंगसाठी साधारणत: १४ दिवस आणि ‘फिनिशिंग’साठी ३ दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. म्हणजेच, दिनांक १५ जून २०२५ च्या पुढेपर्यंत कालावधी वाढू शकतो. हे टाळण्यासाठी दिनांक २० मे २०२५ नंतर प्रत्यक्ष काँक्रिट टाकण्याचे कोणतेही काम हाती घेऊ नये. सुरू असलेले रस्ते काम पूर्ण करावे किंवा चौकापर्यंत आणून थांबवावे. कोणत्याही परिस्थितीत दिनांक ५ जून २०२५ नंतर महानगरपालिकेच्या रस्ते व वाहतूक विभागाचे एकही रस्तारोधक (बॅरिकेडस्) रस्त्यावर आढळता कामा नये, असे निर्देश श्री. अभिजीत बांगर यांनी दिले.
KK/MS