8 हजार किलोमीटर पायी चालत पूर्ण केली हजयात्रा
नाशिक, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करावी अशी प्रत्येक इस्लाम धर्मिय व्यक्तीची इच्छा असते. नाशिकमधील एका ४० वर्षीय व्यक्तीने जवळपास वर्षभर पायी ८ हजार किलोमिटर चालत अनेक अडथळे पार करून हज यात्रा पूर्ण केली आहे. सोमवारी दुपारी नाशिकला ते परतले आणि जिथून या यात्रेला त्यांनी सुरुवात केली होती, त्या बडी दर्गामध्ये मक्कहून आणलेली चादर त्यांनी चढवत आपला प्रवास थांबवला. सायंकाळी आपल्या घरी परतताच परिसरातील नागरिकांसह कुटुंबाने फुलांचा वर्षाव करत त्यांचे स्वागत केले.
अली शहबाज सय्यद हे 2003 साली अजमेरला सायकलवर गेले होते. त्यानंतर 20 वर्षांपासून त्यांचे स्वप्न होते की पायी हजयात्रा करण्याचे. पाकिस्तानने व्हिजा नाकारल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र इराण, इराक मार्गे त्यांनी मक्का गाठले होते. भारताची किंमत काय आहे, हे दुसऱ्या देशात गेलं की कळते असं ते अभिमानाने सांगतात.
नाशिकहून त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर दिंडोरी, पेठ, गुजरात, राजस्थान, दिल्ली, हरियाणा मार्गे ते पाकिस्तानात गेले. मात्र पाकिस्तान सीमेवर पोहोचताच त्यांना अडवण्यात आले. तुम्ही भारताचे आहात. त्यातच आता वातावरण खराब आहे. तुमच्या जीवाला काही झाल्यास जबाबदारी कोण घेणार? असं म्हणत त्यांना पाकिस्तान सैनिकांनी त्यांना व्हिजा देण्यास नकार दिला. पाकिस्तानने व्हिसा देण्यास नकार दिल्याने अली यांच्या समोर मोठी समस्या निर्माण झाली. सर्व प्रवासाची दिशा त्यांची भरकटली गेली होती. त्यानंतर ते 7 ऑक्टोबरला विमानाने इराणला गेले. त्यानंतर परत पायी प्रवास सुरू केला. तिथून इराक, कुवेतमार्गे ते सौदीत पोहोचले. 16 जूनला त्यांनी आपली हजयात्रा पूर्ण केली. मक्का इथं पोहोचलो तेव्हाची ती भावना शब्दात सांगू शकत नाही असे अली सांगतात. . या प्रवासात अली यांच्या गळ्यात तिरंगा होता.
SL/ML/SL
16 July 2024