पावसाळापूर्वची सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण करा

 पावसाळापूर्वची सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण करा

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पावसाळापूर्वी मुंबईत करण्यात येत असलेली रस्ते, पूल तसेच नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण झाली पाहिजेत, आवश्यक तेथे अतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रसामुग्री तैनात करावी, ही कामे होत असताना सर्वसामान्य नागरिकांना अडचणी होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, अशा सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिल्या आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते, पूल आणि पर्जन्य जलवाहिन्या या विभागांकडून मुंबई महानगरात विविध ठिकाणी पावसाळापूर्व कामे सुरू आहेत. त्यातील, पश्चिम उपनगरांमध्ये होत असलेल्या कामांची विशेषतः नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी काल पाहणी केली. त्यावेळी त्यांनी सर्व संबंधितांना कामांच्या पूर्ततेबाबतच विविध निर्देश दिले.

मुंबईकरांना पावसाळ्याच्या कालावधीत कोणत्याही समस्या किंवा अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी रस्ते, पूल, पर्जन्य जलवाहिन्या यासह सर्व संबंधित खात्यांना पावसाळापूर्व कामांचे योग्य नियोजन व अंमलबजावणी करण्याच्या सूचना यापूर्वीच केल्या आहेत. त्यानुसार कामांची योग्य आणि नियोजनबद्ध अंमलबजावणी होते आहे किंवा कसे, याची पाहणी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी पश्चिम उपनगरात हा दौरा केला.

या ठिकाणी दिली भेट
पश्चिम उपनगरातील, आर उत्तर विभागात दहिसर नदी पूल, रुस्तमजी रस्ता, आर मध्य विभागात राजेंद्र नगर पूल, सुमेर नगर रस्ता, लिंक रोडवरील राजेंद्र नगर नाला, आर दक्षिण विभागात लिंक रोड व एम. जी. रोड जंक्शन, लालजी पाडा पोईसर नदी पूल, त्याचप्रमाणे पी उत्तर विभागात रामचंद्र नाला, पी दक्षिण विभागात राममंदीर मार्गावर वालभट नदी येथे अतिरिक्त आयुक्त पी . वेलरासू यांनी पाहणी करुन योग्य ते निर्देश दिले. तसेच, के पश्चिम विभागात ओशिवरा नदी, लिंक रोड, मोगरा नाला, लल्लूभाई पार्क मार्ग याठिकाणीही दौरा करण्यात आला. करण्यात येत असलेली कामे व्यवस्थित असल्याचे श्री. वेलरासू यांनी सांगितले. तसेच पावसाळापूर्व कामे वेळेत करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश देखील त्यांनी दिले.Complete all the pre-monsoon work within the scheduled time

• गोखले पुलाच्या कामाची पाहणी*

अंधेरीतील पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणाऱया अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या कामाची देखील पाहणी करुन अतिरिक्त आयुक्त श्री. वेलरासू यांनी सर्व कामांचा आढावा घेत संबंधितांना आवश्यक त्या सूचना केल्या. जुन्या गोखले पूल निष्कासित केल्यानंतर रेल्वेकडून या कामाचे हस्तांतरण बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे करण्यात आले आहे. या ठिकाणी गर्डर लॉंचिंग, तसेच पूलाच्या दोन्ही बाजुला नवे खांब उभारणे यासारखी कामे महानगरपालिकेच्या पूल विभागाकडून प्रगतिपथावर आहेत. स्टील गर्डर निर्मितीचे कार्यादेशही महानगरपालिकेकडून फेब्रुवारी महिन्यातच देण्यात आले आहेत. पावसाळा सुरु होण्यापूर्वी याठिकाणची अधिकाधिक कामे पूर्ण करण्याचे तसेच संबंधित यंत्रणांसमवेत योग्य तो समन्वय राखण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

मुंबईतील नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांची सद्यस्थिती-

मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील मोठे नाले, द्रुतगती महामार्ग आणि मिठी नदी याठिकाणी महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून नाल्यातून गाळ काढण्याची कामे प्रगतिपथावर आहेत. यंदा या सर्व कामांची सुरुवात मार्च २०२३ पासून झाली आहे. छोट्या नाल्यातून गाळ काढण्याची कामे विभागीय स्तरावर सुरू आहेत. पावसाळापूर्व गाळ उपसण्याचे ३६.८० टक्के इतके काम पूर्ण झाले आहे. यामध्ये मुंबई शहरात ४६.३२ टक्के, पूर्व उपनगरात ५६.४९ टक्के, पश्चिम उपनगरात ४४.६१ टक्के, मिठी नदीच्या ठिकाणी २६.७० टक्के, द्रुतगती महामार्गावर १९.२१ टक्के तर विभागीय स्तरावर छोट्या नाल्याच्या ठिकाणी ३३.३६ टक्के इतकी कामे पूर्ण झाली आहेत. नाल्यातून गाळ काढण्याच्या कामामध्ये आतापर्यंत ३ लाख ५४ हजार ३०४.५८ मेट्रिक टन इतका गाळ काढण्यात आला आहे. पावसाळापूर्व नाल्यातून गाळ काढण्याची कामे दिनांक ३१ मे पूर्वी १०० टक्के पूर्ण करण्याचे आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी दिले.

ML/KA/PGB
20 Apr 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *