ई-सिगारेट ओढल्याने या अभिनेत्या विरोधात तक्रार दाखल

‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ही नेटफ्लिक्सवर नुकतीच प्रदर्शित झालेली आर्यन खान दिग्दर्शित वेबसिरीज सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या वेबसिरीजमधील एका सीनमध्ये अभिनेता रणबीर कपूर ई-सिगारेट ओढताना दिसतो, आणि त्या दृश्यावर कोणतीही आरोग्यविषयक चेतावणी किंवा डिस्क्लेमर दाखवले गेले नाही. यामुळे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) ने या सीनवर तीव्र आक्षेप घेत, रणबीर कपूरसह निर्माते आणि ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सविरोधात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
भारत सरकारने २०१९ मध्ये ई-सिगारेटच्या उत्पादन, विक्री आणि जाहिरातीवर पूर्ण बंदी घातली आहे. त्यामुळे या दृश्यामुळे कायद्याचे उल्लंघन झाल्याचे मानले जात आहे. NHRC ने माहिती व प्रसारण मंत्रालयाला या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले असून, तरुण पिढीवर होणाऱ्या नकारात्मक परिणामांची दखल घेतली आहे.
आर्यन खानने या वेबसिरीजद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले असून, द बॅड्स ऑफ बॉलीवूड ही इंडस्ट्रीतील ग्लॅमर, संघर्ष आणि सत्तेच्या खेळावर आधारित सॅटायर स्वरूपाची कथा आहे. या शोमध्ये शाहरुख खान, सलमान खान, करण जोहर, रणवीर सिंग यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांचे कैमियो आहेत. मात्र रणबीर कपूरच्या एका मिनिटाच्या सीनमुळे संपूर्ण प्रकल्प वादात सापडला आहे.