कारागृहांमध्ये कैद्यांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यास मिळणार भरपाई

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र सरकारने राज्यातील कारागृहांमध्ये कैद्यांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाने या निर्णयाला मंजुरी दिली आहे. त्याच बरोबर कैद्यांच्या मृत्यूच्या प्रकरणांमध्ये दोषी आढळणाऱ्या कारागृह अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.
या नवीन धोरणानुसार, कारागृह कर्मचाऱ्यांच्या मारहाणीमुळे, अपघातांमुळे किंवा कैद्यांच्या आपापसातील भांडणात मृत्यू झाल्यास, आणि यामध्ये प्रशासनाचा निष्काळजीपणा सिद्ध झाल्यास कैद्याच्या वारसांना पाच लाख रुपयांची भरपाई दिली जाईल. तसेच, तुरुंगवासातील आत्महत्येच्या प्रकरणांमध्ये वारसांना एक लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे.
- राज्यातील सर्व कारागृहांमध्ये हे धोरण लागू होणार आहे.
- वार्धक्य, दीर्घ आजार, पलायन करताना अपघात किंवा जामीनावर असताना मृत्यू झाल्यास कोणतीही भरपाई देण्यात येणार नाही.
- नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाल्यास विद्यमान शासन धोरणानुसार भरपाई दिली जाईल.