२०३० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी या शहराची शिफारस

नवी दिल्ली, दि. १५ ऑक्टोबर : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या कार्यकारी मंडळाने २०३० मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी अहमदाबाद शहराची यजमानपदासाठी शिफारस केली आहे. ही शिफारस अधिकृत सदस्यांना सादर केल्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महासभेत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. या निर्णयामुळे भारतात तब्बल दोन दशकांनंतर पुन्हा एकदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भारताने २०१० मध्ये दिल्ली येथे यशस्वीपणे राष्ट्रकुल स्पर्धांचे आयोजन केले होते. आता अहमदाबादच्या माध्यमातून भारत पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात यजमान म्हणून पुढे येण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे, २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठीही भारताने अहमदाबादच्या नावाने यजमानपदासाठी दावा केला आहे, त्यामुळे २०३० ची राष्ट्रकुल स्पर्धा ही त्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकते.
या यजमानपदासाठी भारताची स्पर्धा नायजेरियाच्या अबुजा शहराशी होती. मात्र, राष्ट्रकुल क्रीडा मंडळाने नायजेरियाच्या यजमानत्वाच्या आकांक्षांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि भविष्यातील स्पर्धांसाठी (विशेषतः २०३४) त्यांना संधी देण्यासाठी एक स्वतंत्र धोरण विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.
या शिफारशीमुळे भारताच्या क्रीडा क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळण्याची शक्यता आहे. तसेच, देशातील क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे. आता सर्वांचे लक्ष २६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे.
SL/ML/SL 15 Oct. 2025