ग्रामीण भागातील महिलांसाठी आयोग आपल्या दारी उपक्रम
ठाणे, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ग्रामीण भागातील महिला राष्ट्रीय महिला आयोगपर्यंत पोहोचू शकत नाहीत. यासाठी महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे महिलांच्या ऐशी टक्के टक्के तक्रारी तात्काळ सोडविल्या जात आहेत अशी माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत महिला सक्षमीकरणासाठी सीएसआर निधीचा वापर या विषयावर एकदिवसीय गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन विजया रहाटकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.
महिलांचे आरोग्य, शिक्षण, कौशल्य आदी क्षेत्रात काम करण्याच्या मोठ्या संधी आहेत. यासाठी केवळ सरकार काम करू शकणार नाही तर महिला आयोग, उद्योग, स्वयंसेवी संस्था यांनी एकत्र काम करून महिला सक्षमीकरणासाठी सीएसआर निधीचा योग्य वापर करण्याची आवश्यकता आहे असंही रहाटकर यांनी यावेळी सांगितलं.
राष्ट्रीय महिला आयोग आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमानं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. महिलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी उद्योगांच्या सामाजिक दायित्व निधीचा वापर आणि त्याचं नियोजन, महिला सक्षमीकरणासमोर असलेली आव्हानं आणि त्यावरील उपाय, उद्योग आणि स्वयंसेवी संस्था यांच्यातील समन्वय,
अंमलबजावणीतील अडथळे यावर या परिषदेत चर्चा करण्यात आली. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, महिला आयोगाच्या सदस्या ममताकुमारी, अर्चना मुझुमदार आदी यावेळी उपस्थित होते.
ML/ML/SL
17 Jan. 2025