कौतुकास्पद – मुंबईत लोकल ट्रेनमध्ये तरुणाने केली महिलेची प्रसूती

मुंबई, दि. १६ : मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये मध्यरात्री प्रसूतीवेदनेने तळमळणाऱ्या एका महिलेची एका धाडसी तरुणाने प्रसूती पार पाडली आहे. आई आणि बाळ दोघेही सुखरुप असून या तरुणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुंबईतील राममंदीर रेल्वे स्थानकात लोकल ट्रेनमध्ये प्रसूती वेदनेने विव्हळणाऱ्या महिलेला बघून त्याच डब्यात प्रवास करणाऱ्या विकास बेंद्रे (रा. सुपे , ता.कर्जत) या तरुणाने प्रसंगावधान राखत ट्रेनची इमर्जन्सी चेन ओढून ती राम मंदिर स्टेशनवर थांबवली. त्यानंतर या तरुणाने आपल्या डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल केला आणि तिच्या सूचनांचं तंतोतंत पालन करीत कोणताही वैद्यकीय अनुभव नसतानाही महिलेची यशस्वी प्रसूती केली. रात्री १ च्या सुमारास महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला अन् आई व बाळ दोघांचेही प्राण वाचले.
, रेल्वे स्थानकावर तातडीने कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हती. तसेच रुग्णवाहिका पोहोचायलाही वेळ लागणार होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विकासने आपल्या डॉक्टर मैत्रीण डॉ. देविका देशमुख यांना फोन केला. मध्यरात्र असूनही डॉक्टर देविका यांनी माणुसकीच्या नात्याने घटना ऐकून घेतली आणि व्हिडिओ कॉलवर मार्गदर्शन सुरू केले. वैद्यकीय अनुभव नसतानाही विकासने त्या प्रत्येक सूचनांचे अचूक पालन केले आणि महिलेची प्रसूती करण्यात यश मिळवले. काही मिनिटांतच महिलेने एका गोड बाळाला जन्म दिला.
यानंतर रेल्वे प्रशासन आणि सीआरपीएफ जवानांनी आई-बाळाला जवळच्या रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी सांगितले की, दोघेही पूर्णपणे सुरक्षित आहेत. सोशल मीडियावर लोकांनी विकासवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “हा खरा हिरो आहे”, “रिअल लाइफ रँचो”, “युनिफॉर्म नसलेला देवदूत”, “माणुसकी अजून जिवंत आहे”, अशा असंख्य प्रतिक्रियांद्वारे नेटकरी व्यक्त होत आहेत. दरम्यान, राम मंदिर स्टेशनवरील या घटनेमुळे माणुसकी अद्यापही जिवंत असल्याचं अधोरेखीत झालं आणि दोन जीव वाचले.