नऊ वर्षांच्या चिमुकलीवर कॉक्लियर इम्प्लांट सर्जरी यशस्वीरित्या पूर्ण

मुंबई दि. २१ (एमएमसी न्युज नेटवर्क) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत नाशिक मधील नऊ वर्षांच्या चिमुकलीवर कॉक्लियर इम्प्लांट सर्जरी यशस्वीरित्या पूर्ण झाली असून यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातून दीड लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.
कक्षामार्फत ९ महिने ते २ वर्ष वय असलेल्या बालकांनाच या उपचारासाठी निधी दिला जातो. मात्र, संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून रुग्णावर यशस्वीरित्या उपचार झाले आहेत.
रुग्णाचे वडील हे कंत्राटी पद्धतीने एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. आई गृहिणी असून मोठी बहीण पदवीधर आहे. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असून उपचारासाठी लागणारी रक्कम ही रुग्णाच्या कुटुंबीयांसाठी फार मोठी होती. कक्षाने केलेल्या मदतीमुळे आज माझ्या मुलीवर उपचार होऊ शकले. उद्या ती ऐकू शकेल, बोलू शकेल ही बाब आमच्यासाठी फार मोठी आहे. मुलीच्या जन्मापासून तिनेही सर्वसामान्य मुलांप्रमाणे आयुष्य जगावे असे वाटायचे. परंतु तिची स्थिती पाहून मनाला हळहळ वाटायची. आज तिच्यावर उपचार झाले असताना ती लवकरच सर्वसामान्यांसारखे जीवन जगू शकेल असा विश्वास वाटतो. या सहकार्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कक्षाचे मनस्वी आभार, अशा शब्दात रुग्णाच्या नातेवाईकांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
राज्यातील प्रत्येक आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णाला मदत देण्यासाठी, त्यांच्या कठीण काळात त्यांच्या सोबत खंबीरपणे ऊभा राहण्यासाठी कक्ष प्रयत्नशील आहे. हे करत असताना काही तांत्रिक बाबी आल्यास त्या शिथिल केल्या जातील आणि रुग्णाच्या उपचारांना प्राधान्य देण्यात येईल असे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.
ML/ML/SL
21 April 2025