येत्या हिवाळी अधिवेशनात कोचिंग क्लास नियंत्रण विधेयक

 येत्या हिवाळी अधिवेशनात कोचिंग क्लास नियंत्रण विधेयक

मुंबई, दि २९ : मुंबई शहरात सुरू असलेल्या खासगी कोचिंग क्लासची तपासणी करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने सर्व संबधित अधिकाऱ्यांची समिती गठित करावी. या समितीने मुंबई मधील खासगी कोचिंग क्लासची तपासणी करून पंधरा दिवसात अहवाल सादर करावा असे, निर्देश विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याकरिता खाजगी क्लासेसकडून विद्यार्थ्यांची फसवणूक केली जाणे, मुंबईत ऑनलाईन क्लासेसच्या अशा अनेक शाखा कार्यरत असणे, या संदर्भात पावसाळी अधविेशन 2025 मध्ये विधानपरिषद सदस्य राजेश राठोड यांच्या लक्षवेधीबाबत सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक झाली. या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, आमदार राजेश राठोड, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांच्यासह शिक्षण विभाग आणि मुंबई महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात तसेच राज्यात अनेक खाजगी कोचिंग क्लास सुरू आहेत. क्लास सुरू असलेली जागा, क्लासच्या ठिकाणी अग्नीसुरक्षा, पार्किंग याबाबतची व्यवस्था उचित आहे किंवा कसे, प्रत्यक्षात विद्यार्थ्यांकडून मोठे शुल्क आकारुन कमी रक्कम दाखविणे आणि यात कर चोरी करणे, निवासी संकुल परवानगी असलेल्या इमारतीत खाजगी क्लास सुरु करणे आणि अनधिकृत बांधकाम याबाबतची सर्व तपासणी करण्यात यावी. तसेच विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणाऱ्या फी बाबतही संबधित विभागाने तपासणी करावी, असे निर्देश यावेळी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

राज्यातील खाजगी कोचिंग क्लास संदर्भात विधेयकाचे प्रारूप तयार करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी या बैठकीत सांगितले. हे विधेयक व संबंधित कायदा परिपूर्ण व्हावा या दृष्टिने जनतेकडूनही सूचना मागविण्यात याव्यात, असे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले. खाजगी क्लास संदर्भात सर्व समावेश असे विधेयक आगामी हिवाळी अधिवेशनात मांडले जावे, असेही त्यांनी सांगितले.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *