CNG आणि PNG च्या दरात कपात
मुंबई, दि. १७ : पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने (PNGRB) गॅस दरांच्या रचनेत (Tariff Rationalization) मोठे सुधार जाहीर केले आहेत. यामुळे 1 जानेवारीपासून देशभरात CNG (काँप्रेसड नॅचरल गॅस) आणि PNG (पाईप्ड नॅचरल गॅस) च्या किमतीत प्रति युनिट 2 ते 3 रुपयांची घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व सामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नव वर्षाच्या सुरूवातीलाच हा निर्णय होणार असल्याने ही आनंदाची बातमी समजली जात आहे.
या निर्णयाचा फायदा देशातील 40 गॅस वितरण कंपन्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या 312 भौगोलिक क्षेत्रांना मिळणार आहे. यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या कार, रिक्षा आणि बसचा प्रवास खर्च कमी होईल, तसेच घराघरांत वापरला जाणारा पाईप्ड गॅसही स्वस्त होणार आहे. कंपन्यांनी या कपातीचा थेट लाभ ग्राहकांना द्यावा, यासाठी नियामक मंडळ विशेष लक्ष ठेवणार आहे. या निर्णयामुळे नव वर्षाच्या सुरूवातीलाच सर्वांना दिलासा निश्चितच मिळणार आहे.
झोन रचनेत बदल PNGRB चे सदस्य ए.के. तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस वितरणाची प्रक्रिया आता अधिक सुटसुटीत करण्यात आली आहे. पूर्वी अंतराच्या हिशोबाने तीन झोनमध्ये दर आकारले जात होते, ते आता केवळ दोन झोनमध्ये विभागले गेले आहेत. नव्या नियमांनुसार, देशभरातील सीएनजी आणि घरगुती पीएनजी ग्राहकांसाठी ‘झोन 1’ लागू होईल. या झोनसाठीचा दर आता 54 रुपये निश्चित करण्यात आला आहे. जो पूर्वी 80 ते 107 रुपयांपर्यंत होता. या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरील भार 2 ते 3 रुपयांनी कमी होणार आहे.
SL/ML/SL