सीएनजीच्या कामांना प्राधान्य; एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना
पुणे, दि २४: देशभरातील सीएनजी प्रकल्पांशी संबंधित कामांना प्राधान्याने गती देण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आल्या आहेत. यासोबतच एलपीजी (LPG) पुरवठ्यात उद्भवणाऱ्या अडचणी दूर करून नागरिकांना अखंडित सेवा देण्यावरही भर देण्यात आला आहे. अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि पेट्रोल डीलर असोशीएशनचे राष्ट्रीय सदस्य अली दारूवाला यांनी दिली.
केंद्र सरकारच्या संबंधित विभागाकडून राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना पाठवलेल्या पत्रामध्ये सी एन जी पायाभूत सुविधा उभारणीतील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये पाइपलाइन टाकणे, परवानग्या, रस्ते खोदकाम मंजुरी आणि विविध विभागांमधील समन्वय यावर विशेष लक्ष देण्यास सांगितले आहे.
तसेच, एलपीजी पुरवठ्याबाबत काही भागांत निर्माण होणाऱ्या अडचणींचा आढावा घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वितरण व्यवस्थेत सुधारणा करून ग्रामीण व शहरी भागांमध्ये गॅस उपलब्धता सुरळीत ठेवण्याचे उद्दिष्ट आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारे, स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून नागरिकांना सुरक्षित, परवडणारी आणि अखंडित ऊर्जा सेवा उपलब्ध करून द्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.KK/ML/MS