नागरिकांना शासकीय सेवा आता मोबाईलच्या माध्यमातून

 नागरिकांना शासकीय सेवा आता मोबाईलच्या माध्यमातून

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यासाठीची ऑनलाईन प्रणाली विकसीत करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्री परिषदेची बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , अजित पवार यांच्यासह कॅबिनेट आणि राज्य मंत्री उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हणाले की, राज्यातील विविध विभागांच्या ९६९ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी आपले सरकार पोर्टल वर ५३६ सेवा उपलब्ध आहेत. ९० सेवा संबंधित विभागांच्या पोर्टल वर उपलब्ध आहेत. मात्र सुमारे ३४३ सेवा ऑफलाईन पध्दतीने दिल्या जातात. मात्र या सर्वच सेवा आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करून द्याव्यात. ज्या सेवा सध्या ऑफलाईन पध्दतीने दिल्या जातात त्या सर्व ऑनलाईन करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने पुढाकार घ्यावा. येत्या शंभर दिवसात हे काम पूर्ण करा. अनेक सेवा अधिसूचित करण्यात आलेल्या नाहीत, त्या सर्व सेवा अधिसूचित करण्यासाठी संबंधित मंत्री आणि सचिवांनी पुढाकार घ्यावा.

नागरिकांना सुमारे ९९ टक्के शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत. यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात आपण ईज ऑफ डूईंग बिझनेस संकल्पनेवर काम करण्यावर भर देत आहोत. त्यानुसार अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यावर भर दिला पाहिजे. क्षेत्रीय स्तरावरील अधिकार शासनाकडे केंद्रीत केले जाऊ नये, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

केस गळती प्रकरण

बुलडाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या घटनांबाबत मंत्री परिषदेत चर्चा झाली. केस गळती झालेल्या लोकांच्या अन्न आणि पाण्याचे नमुने घेतले आहेत. सकृतदर्शनी हे प्रकार बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होत असल्याचे निदर्शनास येत आहे. बाधित नागरिकांना औषधे आणि मलम वितरित करण्यात आले आहेत. त्यामुळे केस गळतीच्या प्रमाणात घट झाली असल्याचे स्पष्ट होत आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.

यावर अशा प्रकारांबाबत आरोग्य विभागाने सतर्क रहावे. तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच अशाच प्रकारच्या घटना वर्धा येथे आढळून येत आहेत. त्याकडेही लक्ष द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

ML/ML/PGB 16 Jan 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *